पद भरतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST2021-09-18T04:34:38+5:302021-09-18T04:34:38+5:30
रत्नागिरी : कृषी विभागामध्ये पर्यवेक्षकांसह अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. पंचनामे गावपातळीवर करणे अशक्य ...

पद भरतीची मागणी
रत्नागिरी : कृषी विभागामध्ये पर्यवेक्षकांसह अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. पंचनामे गावपातळीवर करणे अशक्य होते. पद भरतीसह पर्यायी व्यवस्था करण्यासाठी कृषी विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांनी केली आहे.
निराधारांना मदत
देवरुख : कोरोनामुळे अनेकांना नोकरी, रोजगार गमवावे लागले आहेत. कामधंदा नसल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबईतर्फे निवे बुद्रूक येथील निराधार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. यावेळी पदाधिकारी प्रशांत डिंगणकर, तेजस रेवणे उपस्थित होते.
गणेशमूर्ती कार्यशाळा
दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये पर्यावरण शास्त्र व आयक्यूएससी विभागातर्फे ऑनलाईन पद्धतीने इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या संयोजक प्रा. अमृता मोहिते यांनी माहिती दिली. एकनाथ आचरेकर यांनी गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.
उपकेंद्राचे उद्घाटन
दापोली : तालुक्यातील फणसू प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे गावतळे येथे जिल्हा वार्षिक योजनेतून २० लाख १५ हजार ६६९ रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन आमदार योगेश कदम यांच्याहस्ते करण्यात आले. या उपकेंद्रांतर्गत गावतळे रुखी असून, शिवनारे या गावाचा समावेश आहे.
लाठीकाठी स्पर्धेत सुवर्ण
दापोली : तालुक्यातील आदिती पिंपळे व अर्जुन पिंपळे या दोन भावंडांनी लाठीकाठी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले असून त्यांच्या यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. अर्जुन याने ८ तर अदितीने १० वर्षांच्या गटात सुवर्णपदक मिळविले आहे.
निवृत्ती वेतनापासून वंचित
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील सेवानिवृत्तीधारकांना गेल्या आठ महिन्यापासून निवृत्ती वेतनच मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर ऐन वार्धक्यात उपासमारीची वेळ आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे सेवानिवृत्तीधारकांकडून सांगण्यात येत आहे.
शिक्षकांचा सत्कार
मंडणगड : टाकेड करिअर फाउंडेशन व जीवन छाया ग्राहक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. शाल, पुस्तक व भेटवस्तू देऊन शिक्षकांना गौरविण्यात आले. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते अनंत शिंदे, तुकाराम गायकवाड, तुकाराम पाटेकर, सीताराम सुर्वे, वैभव पाटेकर, नीलेश कदम उपस्थित होते.
नॉन कोविड सेंटर
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आता पूर्णपणे नॉन कोविड रुग्णालय म्हणून सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले - गावडे यांनी दिली. गेले वर्षभर शासकीय रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून कार्यरत होते. रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने आता नॉन कोविड सेंटर सुरु केले आहे.
खासगी बँकेची सक्ती
रत्नागिरी : १५ व्या वित्त आयोगाची खाती एका खासगी बँकेत काढण्याचे परिपत्रक शासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात या बँकेच्या फक्त १२ ते १३ शाखा आहेत. त्यामुळे ९०० ग्रामपंचायतींना सेवा कशी उपलब्ध होणार याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. सर्व बँकांच्या जिल्ह्यात ३३० शाखा असून त्या मार्फत व्यवहार सुरु आहेत.
सफल मेस्त्रीची निवड
चिपळूण : खेर्डी येथील माजी सभापती स्नेहल मेस्त्री व माजी सरपंच सुनील मेस्त्री यांचे चिरंजीव सफल मेस्त्री याची निवड खलिफा युनिर्व्हसिटी अबुधाबी येथे केमिकल स्कॉलरशीपसाठी झाली आहे. लंडन येथे सफलने एमएस पूर्ण केल्यानंतर ताे अबुधाबी येथे जाणार आहे.