जिल्ह्यासाठी एक लाख १३ हजार पाठ्यपुस्तकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:35+5:302021-05-11T04:33:35+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मोफत ...

जिल्ह्यासाठी एक लाख १३ हजार पाठ्यपुस्तकांची मागणी
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मोफत देण्यात येतात. जिल्ह्यातील एक लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. वास्तविक गतवर्षी पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष भरल्याच नाहीत. पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा डिसेंबरमध्ये सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थी घरी असल्याने पुस्तके फारशी हाताळली गेलेली नाहीत. त्यामुळे शासनाने गतवर्षीची पाठ्यपुस्तके परत करण्याचे आवाहन केले असले तरी जिल्ह्यातील एकाही पालकाने पाठ्यपुस्तके परत केलेली नाहीत.
गतवर्षी कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन सुरू होते. त्यामुळे पुस्तकांचा फारसा वापर झाला नाही. अधिकाधिक पुस्तके चांगली असतील त्यामुळे यावर्षी वापरणे शक्य असल्यामुळे शासनाने पाठ्यपुस्तके परत करण्याचे आवाहन केले आहे. पाठ्यपुस्तके परत केली तर नक्कीच यावर्षी जुनी पाठ्यपुस्तके वापरता येतील, त्यामुळे पुस्तकांवरील शासनाचा खर्च वाचणार आहे.
पालकांनी पुढाकार घ्यावा
- पालकांनी पाल्यांनी वापरलेली पुस्तके एकत्रित करून शाळांमध्ये जमा करायची आहेत.
- शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांशी संपर्क साधून पुस्तके परत करण्यासाठी वेळ निश्चित करून घेणे आवश्यक आहे.
- पालकांनी पुस्तके परत केली तर शिक्षक पुस्तके व त्याचा दर्जा पाहून मुलांना वापरायला देऊ शकतात. मात्र, अगदी खराब, पाने फाटलेल्या पुस्तकांसाठी मागणी करता येईल. जेणेकरून पुनर्वापरामुळे पाठपुस्तकांवरील शासनाचा खर्च वाचणार आहे. अद्याप पालकांकडून पुस्तके परत करण्यासाठी प्रतिसाद लाभलेला नाही.
पालक म्हणतात
कोरोनामुळे घराबाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे पुस्तके परत करणे अशक्य आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर शाळेने प्रत्येक वर्गासाठी जर एक दिवस व वेळ ठरवून देणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंग राखत पुस्तके जमा करणे व पालकांकडून तपासून घेण्याचे काम शिक्षकांचे सोपे होईल.
- विभावरी जोशी, पालक
दरवर्षी शासन नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देते. त्यामुळे यावषीर्ही नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कोरोनाचे संकट असल्याने वापरलेल्या पुस्तकांबाबत धोका पत्करण्याची कोणाचीच तयारी नाही. त्यामुळे शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करावा.
- ऋता पाल्ये, पालक
ऑनलाइन अध्यापन असले तरी पाठ्यपुस्तकांचा वापर हा झालाच आहे. मोजक्याच मुलांकडील पुस्तकांचा दर्जा चांगला राखला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने जरी जुनी पाठ्यपुस्तके जमा करण्याची सूचना केली असली तरी चांगली पुस्तकेच मुलांना देण्यात यावीत.
- राजेश गुरव, पालक
कोणत्या वर्गात
किती विद्यार्थी
पहिली १०५५८
दुसरी १२३०३
तिसरी १२३८४
चौथी १२६४१
पाचवी ९०५९
सहावी ७९२३
सातवी ८३०९
आठवी ९५००