आरसे बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST2021-09-02T05:08:51+5:302021-09-02T05:08:51+5:30
लांजा : मुंबई - गोवा महामार्गावरील वेरळ घाट अपघात प्रवणक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. यू आकाराच्या वळणावर वाहनचालक व प्रवाशांच्या ...

आरसे बसविण्याची मागणी
लांजा : मुंबई - गोवा महामार्गावरील वेरळ घाट अपघात प्रवणक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. यू आकाराच्या वळणावर वाहनचालक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षित आरसे बसविण्याची मागणी लांजा तालुका व्यापारी संघटनेचे पदाधिकारी खलील मणेर यांनी केली आहे. गणेशोत्सव अवघ्या १० दिवसांवर असून, या मार्गावर वाहतूक वाढण्याची शक्यता आहे.
चिखलाचे साम्राज्य
चिपळूण : शहरात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. खड्डे बुजविण्यासाठी खडीमिश्रित माती, वाळूचा वापर केला जात आहे. परंतु, पाऊस झाल्यानंतर मातीमुळे चिखल निर्माण होत आहे. पावसाची उघडीप झाल्यास वाहनामुळे धुळीचे लोट उडत आहेत. यामुळे वाहनचालक मात्र त्रस्त झाले आहेत.
पूरग्रस्तांना मदत
देवरुख : येथून जवळच असलेल्या कोसुंब येथील श्री जुगाई प्रतिष्ठानतर्फे चिपळुणातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली. मुरादपूर येथील २० कुटुंबांना प्रत्येकी २ हजार, तर कोसुंब रेवाळेवाडी येथील चार बाधित कुटुुंबांना रोख ३ हजारप्रमाणे मदत करण्यात आली. बुरंबी येथील कोरोना सेंटरला मदत करण्यात आली आहे.
एस. टी.ची मागणी
देवरुख : गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी पंचायत समिती सभापती जयसिंग तथा जया माने यांनी केली आहे. शिवाय लॉकडाऊनपासून बंद असलेल्या बसफेऱ्या तत्काळ सुरू करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. गणेशोत्सवापूर्वी या बसेस सुरू झाल्या तर ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सोलकर यांची निवड
आरवली : माहितीचा अधिकार आदी नियम २००५ अन्वये माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ स्वराज्य बहुउद्देशीय संस्था संचलित कोकण विभाग संगमेश्वर तालुका प्रचार प्रमुखपदी अल्पेश सोलकर यांची नियुक्ती करण्यात आली. शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.