घरकूल घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

By Admin | Updated: June 30, 2015 00:18 IST2015-06-29T23:14:26+5:302015-06-30T00:18:42+5:30

बुरंबाड प्रकरणाने हादरा : रक्कम कोणाकडून वसूल करणार

The demand for inquiry into the Gharkul scam case | घरकूल घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

घरकूल घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

देवरूख : बुरंबाड येथील घरकूल प्रकरणात झालेल्या गोलमाल प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर कवळकर यांनी जिल्हा ग्रामीण विकासच्या प्रकल्प संचालकांकडे केली आहे. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, चौकशीनंतर लाभार्थींना दिलेली अनुदानाची रक्कम वसूल करण्यात येईल, असे अधिकारी पनवेलकर यांनी सांगितले.
यापूर्वी देवरूख पंचायत समितीला बुरंबाडमधील झालेल्या तथाकथित घरकूल गोलमाल प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, यासंदर्भात कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी सरपंचांनी संबंधित घरकूल लाभार्थींची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात बोलावली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे.
शंकर कवळकर यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात बुरंबाड ग्रामपंचायत हद्दितील बेघर कुटुंबियांची इंदिरा आवास योजनेंतर्गत प्रतीक्षा यादी सन २००८ मध्ये तयार करण्यात आली होती. आपली नावे घरकूलच्या प्रतीक्षा यादीत समाविष्ट झाल्याने सुमारे चाळीस संभाव्य लाभार्थींनी ग्रामपंचायतीच्या परवानगीने घरे बांधली. सन २०१४ - १५मध्ये प्रतीक्षा यादीला मान्यता मिळाली. असे असताना २००८च्या दरम्यान ज्या संभाव्य लाभार्थींनी घरे बांधली, त्यांच्याच प्रस्तावाना मंजुरी मिळाली असल्याची चर्चा आहे. या लाभार्थींना पस्तीस हजार रूपयांचा पहिला हप्ता अदा करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाला असून, शासनाची फसवणूक करण्यात आली असून मंजुरीसाठी झालेल्या अनेक व्यवहारांबाबतही कवळकर यांनी प्रकाशझोत टाकला आहे. निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात नंदू साठे, भाई लिंंगायत, शशिकांत घाणेकर, काका लिंंगायत, बाबू कवळकर, उदय परकार यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

बुरंबाड येथील घरकूल घोटाळाप्रकरण अनेक महिने गाजले.
माजी सदस्याने आवाज उठवल्यामुळे प्रकरणाची चौकशी होणार.
चौकशीचे काय होणार.

Web Title: The demand for inquiry into the Gharkul scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.