कामकाजाचा बोजवारा

By Admin | Updated: November 1, 2015 22:52 IST2015-11-01T22:52:55+5:302015-11-01T22:52:55+5:30

गुहागर तालुका : संगणकीकृत सातबारा, फेरफारात गोंधळ

Deletion of work | कामकाजाचा बोजवारा

कामकाजाचा बोजवारा

गुहागर : संगणकीकृत सातबारा व फेरफारमुळे जमीन मालकांमध्ये गोंधळ उडाला आहे. याबाबत प्रांताधिकारी रवींद्र हजारे हे गुहागरमध्ये असताना याबाबत संपर्क साधला असता याविषयी सर्व प्रयत्नांनंतरही अपेक्षित यश येत नसल्याचे सांगितले. यामुुळे संगणकीकृत कामकाजाचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून, जमीनमालक व शेतकऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गुहागर तालुका लहान असल्याने राज्यातील प्रथम १० तालुक्यांमध्ये संगणकीकृत सातबारा व फेरफार नोंदीसाठी निवड करण्यात आली. गेल्या दहा वर्षांत तालुक्याला पर्यटनदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाल्याने जागांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
याविषयी प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांना सद्यस्थितीबाबत माहिती विचारली असता सांगितले की, शासनाने दिलेल्या कामकाजाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आमचे काम आहे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आपण करत आहोत. गुहागर तालुक्याचा विचार करता दुर्गम भागात इंटरनेट सुविधा नाही, यासाठी मंडल अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये ब्रॉडबॅण्ड सुविधा देण्यात आली आहे. असे असले तरी या ब्रॉडबॅण्ड सेवेतून संगणकीय नोंदीसाठी अपेक्षित गती मिळत नसल्याने कुठल्याच नोंदी व्यवस्थित होत नाहीत. ही गती वाढवण्याच्या दृष्टीने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन यामधून काही पर्याय निघतो का, याबाबत प्रयत्न चालू आहेत.
काही दिवसांपूर्वी तलाठ्यांना नोंदी घालताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी दोन संगणक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अल्पबचत हॉल येथे माहिती देण्यात आली. मात्र, इंटरनेट स्पीड नसल्याने हे तज्ज्ञही हतबल झाले. अडलेल्या नोंदी पूर्ण व्हाव्यात, यासाठी चिपळूण येथे काही तलाठ्यांना बोलावून तसा प्रयत्न करण्यात आला. यालाही अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक वेळा रविवारी सुटीच्या दिवशी रत्नागिरी येथे जाऊन या नोंदी घालण्याचा प्रयत्न तलाठी करत असल्याचेही प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी सांगितले.
जोपर्यंत मूळ सातबारा उताऱ्याप्रमाणे आॅनलाईन सातबारा जुळत नाही तोपर्यंत आॅनलाईन सातबारा व फेरफार नोंदी करणे बंद करुन हस्तलिखीत नोंदी व सातबारा उतारे देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आता ग्रामीण भागातून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
महसूल विभाग : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
हतबल झालेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महसूल विभागाने सातबारा उतारे आॅनलाईन केले आहेत. मात्र, याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होऊ लागला आहे. सातबारा मागण्यासाठी गेले असता नेट नाही, असे उत्तर दिले जाते. त्यामुळे जुनी पध्दती बरी होती, असे म्हणण्याची वेळ आहे.

Web Title: Deletion of work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.