आजीबाईंचा बटवा अन् काेराेनाला हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:30 IST2021-05-24T04:30:25+5:302021-05-24T04:30:25+5:30

मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेला आजीबाईचा बटवा व त्यातील औषधी वनस्पती व वस्तूंचे ...

Delete Grandma's wallet | आजीबाईंचा बटवा अन् काेराेनाला हटवा

आजीबाईंचा बटवा अन् काेराेनाला हटवा

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेला आजीबाईचा बटवा व त्यातील औषधी वनस्पती व वस्तूंचे महत्त्व पटले आहे. कोरोनाच्या काळात तर स्वत:ला निरोगी ठेवण्याबरोबर सर्दी, पडसे, कफापासून रक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे काढे तयार करून प्राशन केले जात आहेत. आयुर्वेदिक औषधांमुळे आजार बरे होत असून कोणतेही बाह्य आजार यामुळे संभवत नसल्यामुळे आयुर्वेदावर जुन्या पिढीचा विश्वास ठाम आहे. झटपट निकालाची अपेक्षा करणाऱ्या नवी पिढीलाही आयुर्वेदाचे महत्त्व उमगले आहे.

मानवी शरीर वात, कफ व पित्ताने युक्त आहे. पूर्वीपासून ज्या व्यक्तीचे पचन चांगले ती व्यक्ती निरोगी मानली जाते. मात्र प्रतिकारशक्ती एकाएकी वाढत नाही. त्यासाठी आयुर्वेदाचे नियम पाळणे आवश्यक आहे. कोरोना हा कफप्रधान आजार असल्याने कफ होऊ नये किंवा कफ पडून जावा यासाठी आजीबाईच्या बटव्यात अनेक औषधे आहेत. प्रत्येक औषधी जडीबुटीचे महत्त्वही तितकेच वेगळे आहे. लहान बाळापासून मोठ्यांनाही विविध वनस्पती, मुळ्यांचे रस, काढे आजारात फायदेशीर ठरतात. त्यामुळेच थोडीशी सर्दी वाटली तरी आल्याचा, गवती चहा घालून काढा किंवा चहा तयार करून प्राशन केला जातो. हळद जंतुनाशक असल्यामुळे हळदीचे पाणी कोरोना विषाणूपासून रक्षण करण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळेच घरच्या काढ्यांकडे कल अधिक आहे.

ज्या व्यक्तींचे पचन निरोगी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली. आयुर्वेदामध्ये जठराग्नीला अधिक महत्त्व आहे. प्रत्येकाने आपला आहार तपासणे आवश्यक आहे. प्रत्येक आहार पचविणाऱ्यास समस्या नाही; परंतु जठाराग्नीवर अवास्तव व अतिताण येऊ देऊ नये. कोरोना असो वा अन्य विषाणू; तो रोग प्रतिकारक शक्तीच्या बळावर पळवून लावला जातो. मानवी शरीर कफ, वात व पित्तापासून बनलेले आहे. याचे असंतुलनामुळे त्रास होतो. स्वयंपाकघरातील छोट्या-छोट्या वस्तू आजारावर मात करण्यासाठी फायदेशीर ठरतात. विविध वस्तूंचे औषधी गुणधर्म महत्त्वपूर्ण असून त्याचे महत्त्व पटल्यामुळेच वापरही वाढला आहे.

- डाॅ. मंजिरी जोग

नवीन औषधांचे निकाल चांगले व झटपट आहेत. झटपट बरे होण्याची सवय लागल्यानेच काढे दुर्लक्षित झाले. पावसाळ्यात सर्दी होऊ नये यासाठी आले, गवती चहा घातलेला चहा प्राधान्याने प्राशन केला जात असे. कोरोनामुळे असा चहा आवर्जून घेतला जात आहे.

- श्यामला श्रीधर पोंक्षे, रत्नागिरी

जंक फूडच्या नादात पारंपरिक, स्वयंघरातील उपयुक्त वस्तू दुर्लक्षित झाल्या. सर्दी, पडसे असो वा अन्य आजारांत प्राथमिक उपचार पूर्वी घरीच केले जात असत. सर्दीसाठी वेखंड उगाळून लावणे, ओव्याचे तेल फायदेशीर ठरते. हळद घातलेले दूधही उपयुक्त ठरते.

- शिल्पा शरद तांबे, चिपळूण

गरम पाणी प्राथमिक परंतु उपयुक्त आहे. तुळस, धने, दालचिनी, आले, पारिजातकाची पाने, जेष्ठमध घातलेला काढा फायदेशीर आहे. लिंबू, आल्याच्या रसांतून विविध जीवनसत्त्वे प्राप्त होतात.

- उषा जोगळेकर, रत्नागिरी

गुणकारी गवती चहा

सर्दी, पडसे किंवा ताप आल्यास गवती चहा प्यावा; तसेच या त्याच्या काढ्याने वाफारा घ्यावा. पोट दुखत असल्यास किंवा पोटाचे विकार असल्यास गवती चहा पाण्यात उकळून प्यावा. थंडी-ताप किंवा आकडी येत असल्यास गवती चहा उकळून प्यायल्यास आराम पडतो. शरीराचा कुठलाही अवयव दुखत असल्यास गवती चहाचे मालिश गुणकारी ठरते.

जंतुनाशक हळद

हळदीमध्ये लिपोपोलीसॅचिरिडचे घटक आहेत. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. हळदीचे पाणी प्यायल्यास स्नायूंना मजबुती मिळते. सांधेदुखी, आर्थरायटिस यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. हळदीच्या पोषण तत्त्वांमुळे खराब कोलेस्टेरॉलही कमी होते. हळद घालून गरम दूध प्राशनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

जीवनसत्त्वांनी युक्त ‘आले’

अ, क, ई जीवनसत्त्वांनी युक्त व ‘बी’ काॅम्प्लेक्सचा उत्तम स्रोत म्हणून ‘आले’ ओळखल जाते. त्यात मॅग्नेशिअम, फाॅस्फरस, आयर्न, कॅल्शिअम, झिंक मुबलक आहे. आल्यामध्ये ॲन्टीफंगल, ॲन्टीबॅक्टेरियल, ॲन्टीव्हायरल गुणधर्म आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याबरोबर उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास आले सेवन फायदेशीर ठरो. ते अन्य आजारांपासून सुटका करते.

Web Title: Delete Grandma's wallet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.