देवरुखात ‘सप्तलिंगी’ बचाव

By Admin | Updated: May 21, 2015 00:08 IST2015-05-20T21:59:18+5:302015-05-21T00:08:25+5:30

सृष्टी नेचर क्लब : गाळमुक्त नदीसाठी जिल्ह्यातील पहिली मोहीम

Dehurukha 'Saptingali' Rescue | देवरुखात ‘सप्तलिंगी’ बचाव

देवरुखात ‘सप्तलिंगी’ बचाव

देवरुख : देवरुख शहरातून जाणारी टिकलेश्वरच्या पायथ्याशी उगम पावून वांद्री येथे बावनदीला मिळणारी सुमारे १८ किलोमीटर लांबीची सप्तलिंगी नदी प्रदूषणापासून संरक्षित करण्याच्या हेतूने ‘सप्तलिंगी बचाव’ मोहीम राबवण्यात येत आहे. देवरुखमधील ‘सृष्टी नेचर क्लब’च्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.सृष्टी नेचर क्लब या संस्थेने जिल्ह्यात पहिल्यांदाच असा उपक्रम राबवला आहे. या मोहिमेची संकल्पना नेचर क्लब आणि सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांच्या विचारातून पुढे आली आहे. तीन दिवसांच्या कालावधीत ही मोहीम राबवली जाणार आहे. जिल्हा परिषद शाळा, हरपुढे येथे २३ मे रोजी सकाळी या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर सृष्टी नेचर क्लबचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध पर्यावरणविषयकतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी हे स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने नदीच्या पात्रातून पायी प्रवास करुन नदीचा पर्यावरणविषयक तसेच अन्य बाबींविषयक अभ्यास करुन त्याच्या नोंदी करण्यात येणार आहेत.
तसेच या नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या बैठका घेऊन नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि त्याअनुषंगाने विविध योजना राबवण्यासाठी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सृष्टी नेचर क्लबच्या वतीने देण्यात आली आहे.
नदीच्या उगमापासून तळेकांटे येथील बावनदीच्या संगमापर्यंत नदीपात्रातून प्रवास करणे, नदीतील प्रदूषणकारी घटकांचा अभ्यास करुन नोंदी करणे, नदीतील पाण्याची पातळी तपासणे, नदीकाठच्या विविध पाणीपुरवठा योजनांची माहिती संंकलीत करणे, नदीतील बंधारे, डोह व नदी पात्रात साचलेला गाळ यांच्या नोंदी करणे, नदीकाठच्या विविध वनस्पती व वृक्ष यांचा अभ्यास करुन नोंदी करणे, नदीतील मत्स्यजीव व अन्य प्राणीजीवन यांचा अभ्यास करणे, हे या मोहीमेचे उद्देश आहेत.
त्याचबरोबर सप्तलिंगी नदीला मिळणाऱ्या अन्य उपनद्या व पऱ्ये यांच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणाची माहिती संकलीत करणे. संबंधित गावाच्या प्रमुखांना ते प्रदूषण सुरु करण्यासाठी जबाबदारी देण्यात येणार आहे.
मानवी कारणामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत नदीच्या दोन्ही बाजूच्या जनतेला माहिती देऊन त्याबद्दल प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबद्दल आग्रह धरण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

तीन दिवसांची योजना
दरम्यान, सृष्टी नेचर क्लबतर्फे राबवण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यातील पहिला उपक्रम ठरला आहे. खारलँड विभागाने निवडलेल्या दोन बंधाऱ्यांवर ४ किलोवॅट अपारंपरिक ऊर्जा तयार करण्यात येणार होती. त्यामुळे भविष्यात छोट्या गावांसाठी ही ऊर्जानिर्मिती फायद्याची ठरली असती. मात्र, खारलँडकडे त्यासाठी तरतूद नसल्याने हे प्रस्ताव बारगळलेला आहे.

Web Title: Dehurukha 'Saptingali' Rescue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.