देवरुखात बीएसएनएलचा बोजवारा!
By Admin | Updated: November 25, 2015 00:38 IST2015-11-25T00:26:48+5:302015-11-25T00:38:26+5:30
ग्राहकांची गैरसोय : आॅनलाईन बँकिंग सेवाही विस्कळीत

देवरुखात बीएसएनएलचा बोजवारा!
देवरुख : गेल्या दोन दिवसांपासून भारत दूरसंचार निगमच्या मोबाईलला रेंज नसल्याने ग्राहकांतून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. नेटवर्क नसल्याने मोबाईल अक्षरश: खेळण्याचे डबे झाले आहेत. रेंजअभावी देवरुख परिसरातील एटीएमदेखील बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. मोबाईलबरोबरच दूरध्वनीदेखील कोमातच गेले आहेत.
थ्रीजी, फोरजीसारख्या सेवा आज उपलब्ध होत असल्याने आणि गावागावात बीएसएनएलची सेवा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातदेखील बीएसएनएलला मागणी वाढत आहे. मागणी वाढत असताना बीएसएनएल कंपनीने ग्राहकांना विनाव्यत्य सेवा देण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, दिवसेंदिवस बीएसएनएलच्या सेवेचा बोजवारा उडत आहे.
ज्या ठिकाणी सर्वच शासकीय कार्यालये, रुग्णालये, बँका, एटीएम, महाविद्यालये असलेल्या शहरामध्ये बीएसएनएलच्या यंत्रणेचा सलग दोन दिवस बोजवारा उडत असल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.
मोबाईलबरोबरच देवरुख शहरासह आंगवली, साखरपा परिसरातील हजारो ग्राहकांचे दूरध्वनीदेखील कोमातच गेले असल्याने संपर्क साधणे कठीण होऊन बसले आहे. बीएसएनएलच्या या कारभाराबाबत संतप्त ग्राहक कोणत्याही क्षणी कार्यालयावरच धडकण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारनंतर हे दूरध्वनी सुरु करण्यात आले. (प्रतिनिधी)