देवरुखचे दोन युवक पोहताना बेपत्ता

By Admin | Updated: July 27, 2014 00:50 IST2014-07-27T00:48:43+5:302014-07-27T00:50:05+5:30

कॉलेज चुकवून पोहण्याचा मोह नडला : ग्रामस्थांकडून सायंकाळपर्यंत शोधमोहीम

Dehrukh two youths missing while swimming | देवरुखचे दोन युवक पोहताना बेपत्ता

देवरुखचे दोन युवक पोहताना बेपत्ता

देवरुख : कॉलेजला दांडी मारून देवरुखनजीकच्या सप्तलिंगी नदीवरील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी दोघेजण बेपत्ता झाले आहेत. उर्वरित एक विद्यार्थी मात्र नशिबाच्या जोरावर किनाऱ्याला लागला. ही दुर्दैवी घटना आज, शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
अक्षय दिलीप शिंदे, गौरव सदानंद पवार, तुषार दिलीप घडशी, केतन रावणांक, संदेश नारकर असे पाचजण कॉलेज चुकवून सप्तलिंगी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणात पोहण्यासाठी गेले होते. सांब मंदिरानजीक असलेल्या धरणात हे सारेजण पोहण्यास उतरले. यापैकी केतन व संदेश यांनी पोहण्यासाठी उतरण्यास नकार दिला. अक्षय, गौरव व तुषार हे तिघेजण धरणात उतरले. त्यापैकी अक्षय व गौरव हे ज्या ठिकाणी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे मोठा डोह तयार झाला होता तेथे ते ओढले गेले. तुषार किनारी भागातच पोहत असल्याने पाण्याचा अंदाज चुकत आहे, असे कळल्यानंतर तो कसाबसा बाहेर पडला.
बाहेर आल्यावर त्याला अन्य दोघे साथीदार पाण्यात बेपत्ता झाल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी विश्वंभर पवार व रूपेश पावसकर या दोघा मित्रांना मोबाईलद्वारे याची माहिती दिली. हे दोघेही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या प्रमाणावर पाणी पोटात गेल्याने तुषार याला दुचाकीवरून आणून देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारत आहे.
दरम्यान, सप्तलिंगी धरणात बुडालेल्या दोघांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ग्रामस्थांनी पाण्याच्या प्रवाहात शिरण्याचा निर्णय घेतला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या शोधमोहिमेला यश आले नव्हते. घटनेचे वृत्त कळताच देवरुखचे पोलीस निरीक्षक डॅनिअल बेन हे घटनास्थळी दाखल झाले. (प्रतिनिधी)


 

Web Title: Dehrukh two youths missing while swimming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.