वयाच्या ५६व्या वर्षी प्राप्त केली पदवी!

By Admin | Updated: October 19, 2015 23:43 IST2015-10-19T22:39:22+5:302015-10-19T23:43:50+5:30

सुनीता पवार : विवाहानंतरही शिक्षणाची तळमळ कायम

Degree received at the age of 56 years! | वयाच्या ५६व्या वर्षी प्राप्त केली पदवी!

वयाच्या ५६व्या वर्षी प्राप्त केली पदवी!

अमोल पवार --आबलोली शालेय जीवनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती. मात्र, त्यावेळी शिक्षणाचं महत्व ग्रामीण भागात उमगलेलं नव्हते. घरची आर्थिक परिस्थितीही बेताचीच असल्याने इ. ७ वी नंतर शाळा सोडावी लागली. विवाहानंतर प्रपंचात अडकायला झालं. मात्र, शिक्षणाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. आणि त्याच प्रचंड तळमळीतून वयाच्या ५६ व्या वर्षी पदवी प्राप्त करणाऱ्या गुहागर तालुक्यातील आबलोली पागडेवाडी येथील अंगणवाडी सेविका सुनीता महादेव पवार यांच्या दूर्दम्य महत्वाकांक्षेचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.विवाहानंतर प्रपंच, मुलांचं संगोपन यात अडकून पडल्यामुळे काही काळ व्यस्ततेत गेला. मात्र, मुलं मोठी होत होती. शालेय शिक्षण सुरु झाले अशावेळी आबलोली खालील पागडेवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांच्या पुढाकाराने बालवाडी १९९२ साली सुरु करण्यात आली आणि तेथे बालवाडीताई म्हणून त्या काम करु लागल्या. महिन्याकाठी ग्रामस्थ जेमतेम ८० ते १०० रुपये संकलीत करुन देत होते. मात्र, त्यातही समाधान मानून त्यांचे कामकाज सुरु होते. शिक्षण क्षेत्रात कार्यरत झाल्यावर आपल्या कमी शिक्षणाची खंत त्यांना वाटत होती. पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र, योग्य मार्ग मिळत नव्हता. अशावेळी मोठ्या मुलाची दहावीची परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे सन १९९९ मध्ये १७ नं. फॉर्म भरुन बहिस्थ विद्यार्थी म्हणून त्यांनी दहावीची परीक्षा दिली. मोठ्या कालावधीनंतर शिक्षण घेताना दोन विषयात अपयश आले, पुन्हा निराशा पदरात पडली.सन २००० मध्ये बालवाडीचे रुपांतर अंगणवाडीत झाले आणि अंगणवाडी सेविका म्हणून त्या रुजू झाल्या. या ठिकाणीसुद्धा दहावी नापास असल्याने अन्य सेविकांच्या मानाने मानधन कमी मिळू लागले. फरक फक्त काही रुपयांचा होता. मात्र, वेदना मोठी होती. दरम्यान मोठा मुलगा शिक्षक, दुसरा कंपनीमध्ये इंजिनिअर, मुलगी पदवीधर होऊन संसारात रमली होती. पती आबलोली परिसरात माळीकाम करतात. त्याचवेळी आबलोली येथील डीटीएड कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र सुरु झाले. त्यावेळी स्वयंप्रेरणेतून त्यांनी पूर्वतयारी अभ्यासक्रमास नाव नोंदवले. तेथे उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेतला. त्यावेळी दोन विषयात एटीकेटी लागली. तरीसुद्धा हिंमत न हरता त्यांनी ते विषय चिपळूण केंद्रावर सोडवले. द्वितीय, तृतीय वर्ष कला शाखेतून यशस्वीपणे उत्तीर्ण केले. आणि वयाच्या ५६ व्या वर्षी पदवी संपादन केली.
कोणत्याही बढतीसाठी नव्हे तर केवळ आपल्या समाधानासाठी उतार वयात शिक्षणासाठी आग्रही असणाऱ्या सुनीता पवार यांनी संगणक एमएस-सीआयटी परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. त्यांची दूर्दम्य महत्वाकांक्षा आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.


स्थानिक ग्रामस्थांच्या पुढाकाराने बालवाडीताई म्हणून केले काम.
दहावी नापास असल्याने अंगणवाडी सेविका म्हणून मिळत होते कमी मानधन.
आबलोलीत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र.
प्रथम वर्ष कलाशाखेत घेतला प्रवेश.

Web Title: Degree received at the age of 56 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.