सुशोभिकरणाचा उडाला बोजवारा
By Admin | Updated: July 13, 2015 00:36 IST2015-07-12T23:05:51+5:302015-07-13T00:36:28+5:30
नगरसेवक गप्प : वेळेत काम न केल्याने निधी परत

सुशोभिकरणाचा उडाला बोजवारा
चिपळूण : शहरातील नगर परिषद कार्यालयासमोरील जागेत सुशोभिकरणाचे काम पर्यटन विकास योजनेअंतर्गत हाती घेण्यात आले होते. मात्र, हे काम ठेकेदाराने मुदतीत न केल्याने या कामाचा निधी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आला आहे. याबाबत सत्ताधारी व विरोधी नगरसेवकही मूग गिळून गप्प असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पर्यटन विकास योजनेअंतर्गत नगर परिषदेच्या समोरील प्रवेशद्वाराजवळ सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी कामाला प्रारंभ झाला. प्रत्यक्षात हे काम धिम्यागतीने करण्यात आले. पर्यटन विकासकामाचा निधी योग्य वेळी वापरण्यात न आल्याने हा निधी परत पाठवण्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगर प्रशासनाला करण्यात आली. ठेकेदाराने केवळ मातीचा भराव टाकून हे काम अपूर्ण ठेवले आहे. मुदतीत काम न झाल्याने या कामाचा निधी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
नगर परिषद कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा असून, या भागातच सुशोभिकरणाचे काम एका ठेकेदारास देण्यात आले होते. मुदतीत काम न झाल्याने केवळ या परिसरात मातीचा भराव टाकण्यात आला आहे. नगर परिषद कार्यालयासमोर असणाऱ्या या कामाकडे सत्ताधारी व विरोधकही दुर्लक्ष करीत असून सर्वसामान्य जनतेकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नगर परिषद कार्यालयासमोरील काम रखडले असल्याने अन्य कामाच्या दर्जाबाबतही नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरु आहे.(वार्ताहर)
चिपळूण नगर परिषद कार्यालयासमोरच हे काम असून, त्याबाबतही सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक जागरूक नसल्याने वास्तव पुढे आले आहे. जनतेच्या प्रश्नांचा कळवळा राहो. पण, ज्या छत्रपतींच्या नावावर पाच वर्षांपासून प्रचार केला जातो, त्यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या सुशोभिकरणाच्या कामाकडे एकाही नगरसेवकाचे लक्ष नसावे, यापेक्षा दुर्दैवी बाब ती कोणती? असा सवाल एका नागरिकाने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.