लोटेतील ‘दीपक केमटेक्स’ अचानक बंद
By Admin | Updated: November 29, 2015 01:12 IST2015-11-29T01:12:22+5:302015-11-29T01:12:22+5:30
कामगार अस्वस्थ : व्यवस्थापकांना मारहाण झाल्याची तक्रार

लोटेतील ‘दीपक केमटेक्स’ अचानक बंद
आवाशी : कामगार कमी केल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीनंतर कोणतीही पूर्वसूचना न देता लोटेतील दीपक केमटेक्स ही कंपनी एका रात्रीत अचानक बंद करण्यात आली आहे. कंपनीत तयार असलेला दहा हजार किलो माल रातोरात कंपनीतून गायब झाला असल्याने कामगारही बुचकळ्यात पडले आहेत. कंपनी नेमकी कधी सुरू होईल, याची माहिती कोणालाही नसल्याने ३५ कामगार अस्वस्थ झाले आहेत.
दीपक केमटेक्स प्रा. लि. ही कंपनी लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीत, मात्र आवाशी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गेली वीस वर्षे कार्यरत आहे. स्थापनेपासूनच सतत काही ना काही कारणाने ही कंपनी चर्चेत राहिली आहे. कंपनीतील रंग उत्पादनापासून निघणारा घनगाळ उघड्यावर टाकण्यासारखे प्रकार सातत्याने सुरू होते. या घनगाळामुळे एका शेतकऱ्याला फटका बसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कंपनी दोन वर्षांपूर्वी बंद केली होती. त्यानंतर ती पुन्हा सुरू झाली. मागील आठ महिन्यांपासून ही कंपनी प्रदूषणाऐवजी व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणामुळे चर्चेत राहिली आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दोनवेळा प्रसिद्ध केले होते.
दिवाळी पार पडल्यानंतर इथे कार्यरत असणाऱ्या पस्तीस कामगारांपैकी सत्यवान आंब्रे, प्रकाश आंब्रे व दिलीप कुळे या तीन कामगारांना चार दिवसांपूर्वी तडकाफडकी कामावर येण्यास मज्जाव करण्यात आला. त्याबाबतची कोणतीही लेखी सूचना आपल्याला दिलेली नसल्याचे या कामगारांनी सांगितले. हे तीनही कामगार महाराष्ट्र नवनिर्माण सेना युनियनचे सदस्य आहेत.
शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता वैभव खेडेकर, युनियनचे उपाध्यक्ष राजेंद्र घाग व माजी विभागाध्यक्ष नाना चाळके हे कंपनीत गेले होते. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक एस. डी. महाडिक व त्यांच्यात चर्चा सुरू असताना महाडिक यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे किरकोळ बाचाबाची झाली. चर्चा निष्फळ ठरल्याने उद्यापासून गेटबंद आंदोलन पुकारू, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, शनिवारी सकाळी पहिल्या सत्रात व दुसऱ्या सत्रात आलेले जवळपास पंधरा कामगार अकरा वाजेपर्यंत कंपनीत बसून होते. कंपनी व्यवस्थापक, शिफ्ट इंचार्ज वा सुपरवायझर कोणीही कंपनीत न आल्याने ते भांबावून गेले. कामावर आलेले सर्व कामगार हे युनियनचे सभासद होते.
कंपनीत मागील एक महिन्यापासून तयार केलेला अंदाजे दहा हजार किलो माल गायब झाला असून, कंपनीचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. अखेर या कामगारांनी दुपारपर्यंत वाट पाहून घरी जाणे पसंत केले. मात्र, याबाबत कोणालाही काहीही माहिती नसल्याचे समजते. याबाबत कंपनी पर्यवेक्षक प्रताप खेतले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी मनसेचे वैभव खेडेकर यांच्यासोबत आलेले राजेंद्र घाग व नाना चाळके यांनी कंपनी व्यवस्थापक महाडिक यांना मारहाण केली असून, आमच्याही जिवाला धोका असल्याने शनिवारी कंपनीत कोणीही आलेले नाही. मात्र, वीजपुरवठा का बंद करण्यात आला आहे याबाबत त्यांनी बोलणे टाळले. रात्री दहा हजार किलो माल कंपनीबाहेर काढल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे कंपनी नेमकी कधी सुरू होणार, की ती बंदच राहणार, याचे कोडे उलगडलेले नाही. (वार्ताहर)
आमच्याकडे शुक्रवारी रात्री दीपक केमटेक्स या कंपनीचे महाडिक यांनी राजेंद्र घाग व नाना चाळके यांनी कंपनीत येऊन मारहाण केल्याची साधी तक्रार दिली आहे. महाडिक हे आजारी असून, दोन दिवसांनंतर रीतसर तक्रार देण्यासाठी येणार आहेत.
- विवेक साळवी,
हवालदार, लोटे पोलीस दूरक्षेत्र
मला घशाचा त्रास होत असून, बोलता येत नाही. मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. कृपया मला सहकार्य करावे.
- एस. डी. महाडिक,
व्यवस्थापक, दीपक केमटेक्स प्रा. लि.