कोयनेतील पाणीसाठ्यात घट
By Admin | Updated: September 7, 2015 22:40 IST2015-09-07T22:40:05+5:302015-09-07T22:40:05+5:30
तीन दिवसांत सात टीएमसीने कमी : वीजनिर्मिती, सिंचनासाठी वापर सुरूच

कोयनेतील पाणीसाठ्यात घट
पाटण : कोयना धरणातील पाणीसाठा शुक्रवार, दि. ४ रोजी ८२ टीएमसी होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत धरणातील पाणीसाठा तब्बल सात टीएमसीने घटला आहे. दुष्काळाचे सावट गडद होत असतानाच वीजनिर्मिती आणि सांगलीकडील सिंचनासाठी सुरू असलेला पाणी वापराचा सपाटा, यामुळे ही घट होत आहे.
कोयना धरणात सध्या ७९.१९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तीन दिवसांपूर्वी हाच साठा ८२.१९ होता. गेल्या वर्षी याच दिवशी धरण १०४.९३ टीएमसी पाण्याने भरले होते. यावरून आता धरणातील पाणी साठ्याची चिंता गंभीर बनल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच वीजनिर्मितीस पूर्वेकडील सिंचनासाठी दिवसाला सरासरी एक टीएमसी पाणी वापरले जात आहे. यापुढे पाणी वापरात मोठी वाढ होणार असून, पाऊस न झाल्यास आगामी मार्च, एप्रिल, मे महिन्यांत तीव्र पाणी टंचाईचे महासंकट उभे राहण्याची भीती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)