रत्नागिरी जिल्ह्यातील काेराेना रुग्णांमध्ये घट, ५५ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:39 IST2021-09-10T04:39:22+5:302021-09-10T04:39:22+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोराेनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी असून, दिवसभरात ५५ रुग्ण सापडले आहेत, तर ८५ रुग्ण ...

रत्नागिरी जिल्ह्यातील काेराेना रुग्णांमध्ये घट, ५५ नवे रुग्ण
रत्नागिरी : जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोराेनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी असून, दिवसभरात ५५ रुग्ण सापडले आहेत, तर ८५ रुग्ण बरे झाले आहेत. एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात १,२८३ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी गणेशोत्सवानिमित्ताने हजाराे चाकरमानी जिल्ह्यात आल्याने आरोग्य यंत्रणेकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. जिल्ह्यात अजूनही कोरोना चाचण्या वाढवण्यात आलेल्या नसून दिवसभरात ३,७९९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात अँटिजन चाचणीत ३१ रुग्ण, तर आरटीपीसीआरमध्ये २४ रुग्ण आढळले. या चाचण्यामध्ये लांजा, राजापूर तालुक्यांत एकही बाधित रुग्ण सापडलेला नाही, तर मंडणगड, दापोली आणि खेड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण, गुहागरात १०, चिपळुणात ११, संगमेश्वरात २ आणि रत्नागिरीतील सर्वांत जास्त २३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ७६,७२८ रुग्ण सापडले आहेत.
दिवसभरात खेड तालुक्यात जिल्ह्यातील एकमेव कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण २,३६६ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. बाधितांच्या मृत्यूचा दर ३.८ टक्के आहे. ७३,०७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांचा बरे होण्याचा दर ९५.२४ टक्के आहे.