रॉकेलच्या कोट्यात झपाट्याने घट
By Admin | Updated: January 20, 2015 23:34 IST2015-01-20T22:13:10+5:302015-01-20T23:34:57+5:30
बुरे दिन : दोन लीटरऐवजी आता प्रत्येक माणसाला मिळणार फक्त दोनशे मिलीलीटर

रॉकेलच्या कोट्यात झपाट्याने घट
रत्नागिरी : पूर्वी माणसी २ लीटर रॉकेलचे होत असलेले वाटप कमी करून आता केवळ २०० मिलीलीटर इतकेच केले जाणार असल्याने शासनाच्या या धोरणाबाबत ‘अच्छे दिन’ची स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांवर ‘हेच का ते अच्छे दिन’ म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये रॉकेल कपात करण्यात आली आहे. तेल, साखर, कडधान्यांपाठोपाठ आता रॉकेलही रेशनकार्डवरून गायब होते की काय, अशी शंका सामान्यांमधून व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात श्वेत शिधापत्रिकाधारक वगळून ३ लाख ७५ हजार ८५४ नागरिकांना रॉकेल वितरीत केले जाते. डिसेंबर २०१४पर्यंत शहरी भागात महिन्याला प्रतिमाणसी २ लीटर आणि प्रतिशिधापत्रिका जास्तीत २० लीटर रॉकेल, तर ग्रामीण भागात महिन्याला प्रतिमाणसी २ लीटर आणि प्रतिशिधापत्रिका जास्तीत १५ लीटर रॉकेल वितरीत करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. प्रत्यक्षात जिल्ह्याची रॉकेलची एकूण मागणी २८३० किलोलीटर इतकी होती. मात्र, या मागणीच्या ३७ टक्केच म्हणजे १०६८ किलोलीटर इतकेच रॉकेल जिल्ह्यासाठी पाठविले जात होते.त्यातच आता जानेवारी ते मार्च २०१५ या तीन महिन्यासाठी केवळ ६४८ किलोलीटर (२३ टक्के) इतकाच रॉकेल कोटा मंजूर झाला आहे. त्यामुळे तालुक्यांना याचे कसे वितरण करायचे, असा पेच पुरवठा विभागासमोर निर्माण झाला आहे. जानेवारीचा रॉकेलचा कोटा उशिरा आल्याने पुरवठा विभागाने डिसेंबरच्या कोट्यातील ६० टक्के रॉकेलचे वितरण आधीच केले आहे. त्यामुळे आता जानेवारी महिन्यातील रॉकेलचे वितरण करताना दुकानदारांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अधिक माहिती घेता, केंद्र सरकारकडून आलेल्या धान्याच्या कोट्यामधून राज्यातील धान्याचा कोटा मंत्रालयातून मंजूर होतो. रॉकेलच्या कपातीबाबत मंत्रालयात चौकशी केली असता केंद्राकडूनच कमी रॉकेल साठा पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश रास्त दर धान्य दुकानदारांनी प्रति माणसी २०० मिलीमीटरप्रमाणे रॉकेलचे वितरण करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील दुकानदारांनी सोमवारी येथील तहसीलदार मारूती कांबळे यांची भेट घेऊन आम्ही रॉकेलचे वाटप जनतेला कसे करायचे, याविषयी मार्गदर्शन करावे, अशी विनंती केली. यातून काहीतरी मार्ग काढू, असे कांबळे यांनी या दुकानदारांना सांगितले आहे. जिल्ह्यात रॉकेलचे १३ घाऊक विक्रेते आहेत. मात्र, आता पुरवठा विभागाबरोबर सर्वच दुकानदारांसमोर रॉकेलच्या वाटपाचा घोळ निर्माण झाला आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील जनता रॉकेलवर अवलंबून असते. मात्र, आता महिन्याला केवळ २०० मिलिलीटरवर गुजराण कशी करणार, एवढेसे रॉकेल दिव्याला तरी पुरेल का, असा सवाल ग्रामीण जनता करीत आहे. या भागातील जनतेला रॉकेल मिळेल काय, असा प्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी)
रॉकेल कपातीचा संबंधिताना फटका बसणार
नव्या सरकारच्या घोषणेनुसार सामान्य माणसाला ‘अच्छे दिन’ येतील, असे वाटले होते. परंतु ही ‘बुरे दिन’ ची लक्षणे दिसतात. पामतेल, डाळी, साखर आदी कार्डवरून गायब झालेच आहे. आता काही दिवसांनी रॉकेलही गायब होणार की काय, असा सवालही सामान्य जनतेमधून विचारला जात आहे.
शासनाने प्रतिव्यक्ती केवळ २०० मिलिलीटर रॉकेल देण्याची घोषणा केली आहे. सध्या रॉकेलचा लीटरचा दर १६ रूपये २५ पैसे इतका आहे. म्हणजे आता दुकानदाराला २०० मिलिलीटर इतक्या रॉकेलसाठी ३.२५ रूपयाची पावती देण्यासाठी एक रूपया खर्च करावा लागणार आहे. आधीच दुकानदारांना कमी मार्जिन आहे. त्यातच आता रॉकेल कपातीचा फटकाही बसणार आहे.
- नितीन कांबळे,
रास्तदर धान्य दुकानदार, नाणीज.
तालुकाशिधापत्रिकाकि.ली.
मंडणगड१८७५३१३८
दापोली४२७८७२५८
खेड४४९५८२३४
गुहागर३३७१५२६२
चिपळूण ३८६४१४४४
संगमेश्वर५०७५३४२२
रत्नागिरी८२६८८४९८
लांजा२८१५८२३३
राजापूर४५४०१३४३
एकूण३,७५,८५४२८३०