मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी कोकण विभागीय मंडळामार्फत तयारी सुरू आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.
कोरोनामुळे निम्मे शैक्षणिक सत्र ऑनलाइन संपले. नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. अभ्यासाच्या ताणामुळे काही विद्यार्थ्यांनी गॅप घेतला असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. बोर्डाची परीक्षा असल्याने गुणवत्तेवर परिणाम होण्याच्या भीतीमुळे यावर्षी परीक्षा न देता पुढच्या वर्षी परीक्षा देण्याचा निर्णय काही विद्यार्थ्यांनी घेतला आहे. पालकांनीदेखील मुलांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला आहे.
गतवर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २३ हजार ७३६ विद्यार्थी बसले होते. मात्र, यावर्षी २१ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी ४०९ असून, दिव्यांग २०४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २ हजार ३५८ विद्यार्थी कमी आहेत. बारावीसाठी गतवर्षी २०,१४८ विद्यार्थी होते, यावर्षी १७ हजार ६७६ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज सादर केले आहेत. दिव्यांग २९ व पुनर्परीक्षार्थी ४०९ आहेत. गतवर्षीच्या तुलनेत २४७२ विद्यार्थी कमी आहेत. तुलनात्मकदृष्ट्या हा फरक प्रचंड आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षा बोर्डाच्या असल्याने शैक्षणिक टप्प्यातील महत्त्वपूर्ण परीक्षा आहेत. गणित, विज्ञानसारख्या काठिण्यपातळीवर विषयाबाबत मुलांमध्ये आधीच भीती आहे. निम्मे सत्र ऑनलाइन होते. त्यामुळे शिकवण्यास वेळेची मर्यादा होती. आकलन झाले अथवा नाही हे कळणे अवघड होते. कोरोनामुळे अभ्यासाचा खेळखंडोबा झाल्याने परीक्षार्थींच्या संख्येत घट झाली आहे.