राजापूर : कोकण आणि कोल्हापूर यांना जोडणारा आणखी एक घाटमार्ग राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावातून बनविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या घाटरस्त्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. परराज्यातील एका कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आल्याची माहिती संबंधित बांधकाम विभागाकडून मिळाली आहे.जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत काही घाटांत दरडी कोसळून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राशी दळणवळणाचा संपर्क काही दिवस बंद पडला होता. त्यानंतर काजिर्डा घाटाचा मुद्दा प्रकाशात आला होता. यापूर्वी सने १९७४-७८ मध्ये रोजगार हमी योजनेतून काजिर्डा-कोल्हापूर जोडणाऱ्या घाटाच्या खोदकामाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, अणुस्कुरा घाटाच्या कामानंतर काजिर्डा मार्गे घाटरस्त्याचे काम मागे पडले हाेते.काजिर्डा घाट मार्ग हाेण्यासाठी राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शासन दरबारी प्रयत्न सुरू केले हाेते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी राज्याच्या अर्थसंकल्पात काजिर्डा घाटाच्या सर्वेक्षणासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार करून रस्ता सर्वेक्षणासाठी निविदा काढण्यात आली. त्यानुसार परराज्यातील एका कंपनीला ते काम मिळाले आहे.काजिर्डा-कोल्हापूर हे अंतर सुमारे ५० ते ५५ किलाेमीटरचे असून, अन्य घाट मार्गाच्या तुलनेत सुमारे ३० ते ३५ किलाेमीटर अंतर वाचू शकणार आहे. पडसाळी (कोल्हापूर) ते बाजार भोगाव अंतर सुमारे २० किलाेमीटर तर बाजार भोगाव ते कोल्हापूर अंतर ३० ते ३५ किलाेमीटर आहे.
- काजिर्डा घाट चार ते साडेचार किलाेमीटरचा असला तरी सुरक्षित केला जाणारा रस्ता लक्षात घेता जवळपास आठ ते दहा किलाेमीटरची घाटाची व्याप्ती होऊ शकते.
- या घाटामुळे आजूबाजूच्या ५५ ते ६० गावांना कोल्हापूरसाठी फायदा होणार आहे .
- कोल्हापूर, कळे, बाजार भोगाव काळजवडे, पडसाळी, काजिर्डा, मूर, तळवडे, पाचल, रायपाटण, ओणी, राजापूर असा त्या घाटरस्त्याचा मार्ग असेल. पन्हाळा तालुक्यातील शेवटचे गाव पडसाळी आहे.