स्वच्छता कराचा निर्णय दोन वर्षे स्थगित ठेवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:27+5:302021-09-02T05:07:27+5:30
- शिरीष काटकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून शहरात लागू करण्यात ...

स्वच्छता कराचा निर्णय दोन वर्षे स्थगित ठेवावा
- शिरीष काटकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून शहरात लागू करण्यात येणाऱ्या स्वच्छता कराचा विषय वादग्रस्त बनला आहे. मात्र, स्वच्छता कर लागू करण्याची ही वेळ नव्हे. तेव्हा नगरपरिषदेने दोन वर्षे हा निर्णय स्थगित ठेवावा, शासनाकडे तसा प्रस्ताव तात्काळ पाठविण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शिरीष काटकर यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे
येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शिंगटे यांनी २८ ऑगस्ट २०२१ रोजी घरपट्टीबाबत जाहीर आवाहन केले की, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ‘ब’ १९ डिसेंबर २०१९ चे परिपत्रकानुसार नगरपरिषदेच्या ९ जानेवारी २०२१ च्या अर्थसंकल्पीय सभेत ठराव क्रमांक ६४ नुसार स्वच्छता कराविषयी निर्णय झाल्याचे म्हटले आहे. मात्र, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यापाठोपाठ माजी नगरसेवक काटकर यांनी मुख्याधिकारी शिंगटे यांना पत्र देऊन या स्वच्छता कराला तूर्तास विरोध दर्शविला आहे.
त्यांनी या पत्रात म्हटले आहे की, दोन वर्षे कोरोनाच्या परिस्थितीमुळे व्यापारी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यानंतर आता महापुरात ९० टक्के चिपळूण शहर बाधित झाले असून, त्यातून चिपळूणवासीय अजूनही सावरलेले नाहीत. अशावेळी कर लादून नागरिकांना नाहक त्रास देऊ नये. नगरपरिषदेने तातडीने विशेष सभा घेऊन या कराचा निर्णय किमान दोन वर्षांसाठी स्थगित करावा. मात्र, तसे न झाल्यास जनआंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही काटकर यांनी दिला आहे.