वीज वाहिन्या की मृत्यूसापळा

By Admin | Updated: August 1, 2014 23:20 IST2014-08-01T22:11:48+5:302014-08-01T23:20:55+5:30

संगमेश्वर तालुका : महावितरणचा कारभार, ग्राहकांच्या जिवाचा होतोय खेळ

Death of electricity channel | वीज वाहिन्या की मृत्यूसापळा

वीज वाहिन्या की मृत्यूसापळा

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्या धोकादायक बनल्या आहेत. गेल्या महिनाभरात तीनवेळा वीज वाहिनी तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. त्यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्यांना आपल्या डोक्यावरुन जाणारी महावितरणची वीज वाहिनी म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळा भासत आहे.
महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना सुविधा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. वीजबिल वसुली मात्र कायद्याचा बडगा दाखवून केली जात आहे. सध्या झालेल्या आॅनलाईन तक्रार सुविधेमुळे महावितरणचे काम सुलभ झाले असले तरी ग्रामीण भागातील ग्राहकांना मात्र या जाचक सुविधेमुळे आठ ते दहा दिवस अंधारात राहावे लागत आहे. तक्रारवही गायब झाल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. पावसाळी हंगाम असल्याने आणि वीज लाईनभोवती वाढलेल्या झाडीची साफसफाई न झाल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या तक्रारीतही वाढ झाली आहे. कडवई परिसरातही गेले काही दिवस वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या सततच्या वीज पुरवठा खंडित होण्याने अनेक ठिकाणी वीज उपकरणे निकामी होत आहेत.
कडवई आणि पंचक्रोशीला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या अनेक वर्षांपूर्वीच्या असून, महावितरण कंपनीकडून त्या बदलणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी अशाच काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटून अपघात घडले होते. चालू वीज वाहिनी पडून विनायक मयेकर यांच्या रिक्षेचे नुकसान झाले होते. या रिक्षाचालकालाही महावितरणने मदतीचा हात पुढे केला नाही. कडवई बाजारपेठ येथे तर या वाहिन्यांचे धोकादायक जाळे दिसून येते. या वाहिन्यांखालचे सुरक्षा गार्डही काही ठिकाणी गंजून लोंबकळत असताना दिसून येतात. गेल्या पंधरा दिवसात कडवईतील अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटून रस्त्यावर पडण्याचे प्रकार वाढले आहेत. महावितरणला माहिती मिळेपर्यंत या वाहिन्यांमधून प्रवाह चालू असतो. अशावेळी गंभीर अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. समर्थनगर येथे एकाच ठिकाणी वीज वाहिनी तुटून रस्त्यावर पडण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. अपघात होता होता एक रिक्षाचालक बालंबाल बचावला. महावितरण कंपनी सोयीसुविधांना प्राधान्य देणार का? महावितरण सर्वच गोष्टी ग्राहकांकडून खरेदी करुन घेत आहे. खराब झालेल्या वाहिन्याही ग्राहकांच्या पैशातून बदलल्या जात आहेत. मग वीजबिलात आकारले जाणारे विविध अधिभार आणि अनामत रक्कम कुणाच्या खिशात जातात, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Death of electricity channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.