दुचाकीच्या धडकेने बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: November 1, 2015 22:59 IST2015-11-01T22:59:59+5:302015-11-01T22:59:59+5:30
रत्नागिरी-नाटे मार्गावर अपघात

दुचाकीच्या धडकेने बालकाचा मृत्यू
रत्नागिरी : रत्नागिरी-नाटे मार्गावर धारतळे येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी चालकाने आईसोबत चालणाऱ्या ५ वर्षीय बालकाला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये बालक मृत झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. नागाप्पा बळतअप्पा माळीपाटील (५, ईतगिरी, कर्नाटक) असे मृत बालकाचे नाव आहे.
रविवारी दुपारी नागाप्पा हा त्याची आई पाणी भरून आणत असताना तिचा हात धरून रस्त्याने जात होता. याचवेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकी (एमएच-०८-एडी-३५०७) घेऊन कयुब अब्दुल करीम (रत्नागिरी) भरधाव वेगाने येत होता. धारतळे येथे कयुबचा दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकीने आईसोबत चालणाऱ्या नागाप्पाला धडक दिली. या धडकेने नागाप्पा हा २० फूट रस्त्याबाहेर फेकला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्याच्या आईला कोणत्याही प्रकारे दुखापत झाली नाही.
नागाप्पाला धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार तेथून पळ काढत असताना चिरेखाणीवर काम करणाऱ्या इतर कामगारांनी आरडाओरडा केला. त्यामुळे तो थांबला. या बालकाला त्याच्या नातेवाईकांसह प्रथम धारतळे येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आले. तेथून अधिक उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागाप्पाला तपासले असता तो मृत असल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली. या माहितीनुसार पोलिसांनी दुचाकीचालकावर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)