कोकण रेल्वे मार्गावर दिवस-रात्र ‘पहारा’
By Admin | Updated: June 26, 2014 00:21 IST2014-06-26T00:12:24+5:302014-06-26T00:21:46+5:30
५०० कर्मचारी तैनात : रत्नागिरी, बेलापूर, कारवारला नियंत्रण कक्ष, रत्नागिरी, वेर्ण्यात एआरएम व्हॅन सुविधा

कोकण रेल्वे मार्गावर दिवस-रात्र ‘पहारा’
रत्नागिरी : पावसाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी मार्गावर २४ तास गस्त सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ५०० कर्मचारी डोळ्यात तेल घालून दिवस-रात्र पहारा देत आहेत. मार्गावर दर तासाला पावसाचे प्रमाण देणारी वर्षामापन यंत्रे बसविण्यात आली आहेत. बेलापूर, रत्नागिरी व कारवार येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून, ते पावसाळा संपेपर्यंत २४ तास कार्यरत राहणार आहेत. सुरक्षेबाबत आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक नंदू तेलंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोकण रेल्वेमार्गावरील पावसाळी सुरक्षिततेची माहिती आज, बुधवारी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. गेल्या काही वर्षांत सतत धोकादायक ठरलेल्या पोमेंडी व निवसर येथील उपाययोजनांसाठी पाहणी दौराही आयोजित केला होता. त्याआधी पत्रकार परिषदेत तेलंग यांनी उपायांची माहिती दिली.
कोकण रेल्वेमार्गावर मान्सून ब्लॉक सेक्शन गस्तीची ७१, तर रेल्वे मार्गावरील बोगद्यांमधील गस्तीची ३८ ठिकाणे आहेत. कटिंग्जची २४ ठिकाणे आहेत. या सर्व ठिकाणी रात्रंदिवस गस्त सुरू आहे. त्यासाठी रेल्वेचे ३५०, तर १५० कंत्राटी कर्मचारी गस्तीचे काम करीत आहेत. याशिवाय धोक्याची सूचना देण्यासाठी मार्गावर एक किलोमीटरवर अंतरावर रेडिओ सॉकेट कॉल सिस्टीम बसविण्यात आली आहे. त्यामुळे काही आपत्ती आल्यास तत्काळ त्याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती मिळणार आहे. सुरक्षाव्यवस्था पाहणाऱ्या गस्त कर्मचाऱ्यांकडे डिटोनेटर, रेट्रो रिफ्लेक्टिंग जॅकेट व अन्य सुरक्षा साहित्य देण्यात आले आहे.
मार्गाच्या काही ठरावीक अंतरावर जनरेटर्सची व्यवस्थाही करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास रत्नागिरी, चिपळूण, खेड या ठिकाणी बेस्ट किचनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यावेळी सुमारे हजारपेक्षा अधिक लोकांना तातडीने भोजन व फराळाची व्यवस्था केली जाऊ शकेल. मात्र, अतिवृष्टी, मार्गालगत सापडणारी जांभ्या दगडाची माती (भूगर्भ शास्त्रज्ञांनाही विशेष आव्हान ठरणारी), भूगर्भीय संरचना ही आव्हाने आजही कोकण रेल्वेसमोर असल्याचे ते म्हणाले.
कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक नंदू तेलंग यांच्यासमवेत कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता अलप्रकाश, मंजुनाथ, क्षेत्रीय अभियंता रेवनसिद्धाप्पा, सहायक वाणिज्य प्रबंधक सुनील नारकर, जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)