देवरुख : अन्नातून विषबाधा झाल्याने पितापुत्रांना रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब रेवाळवाडी येथे मंगळवारी (२२ जुलै) घडली. घरातील कामे करण्यास सांगितल्याच्या रागातून त्या घरच्या सुनेने अन्नातून जाणीवपूर्वक विषारी द्रव्य मिसळल्याचा गुन्हा पाेलिसांनी दाखल केला आहे. त्यानुसार स्वप्नाली सचिन सोलकर (३२) हिला शुक्रवारी (२५ जुलै) पाेलिसांनी अटक केली आहे.याबाबतची फिर्याद महिलेचा पती सचिन जगन्नाथ सोलकर यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह १३ एप्रिल २०२३ रोजी झाला. जगन्नाथ सोलकर हे घरातील कचरा काढणे, साफसफाई करणे आणि इतर कामे नीट करण्यास सांगत असत. याचा राग मनात धरून जेवणात विषारी द्रव्य मिसळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हेच जेवण सचिन सोलकर यांनीही खाल्ल्याने त्यांनाही विषबाधा झाली आहे.
जगन्नाथ सोलकर आणि सचिन सोलकर यांना अचानक अस्वस्थ वाटल्याने त्यांना प्रथम देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हस्तांतरित करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. दोघांवरही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. अधिक तपास देवरुखचे पोलिस निरीक्षक उदय झावरे करीत आहेत.
घटनास्थळी पाहणी करून पंचनामाया घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. यावेळी पोलिस निरीक्षक उदय झावरे, हेडकॉन्स्टेबल प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, सचिन पवार, सहायक पोलिस फौजदार श्रीकांत जाधव, महिला कॉन्स्टेबल मंजुश्री पाडावे उपस्थित होते.