शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अद्याप तारीख निश्चित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:36+5:302021-05-12T04:32:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनामुळे दोन वेळा पुढे ...

The date for the scholarship examination is yet to be decided | शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अद्याप तारीख निश्चित नाही

शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अद्याप तारीख निश्चित नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनामुळे दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. वास्तविक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणारी परीक्षा रद्द करीत एप्रिल व नंतर मेमध्ये घेण्याचे जाहीर केले होते. मात्र पुन्हा शासनाने परीक्षा पुढे केली असली तरी, तारीख मात्र अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवीसाठी, तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीसाठी राज्यात सर्वत्र एकाच दिवशी व एकाच वेळी घेण्यात येते. या परीक्षेसाठी १४ ते १५ हजार विद्यार्थी परीक्षेसाठी बसतात. जिल्ह्यातून पाचवीसाठी दीड हजार शाळांमधील नऊ ते साडेनऊ हजार विद्यार्थी, तर आठवीसाठी साडेचारशे शाळांमधील पाच ते साडेपाच हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसणार आहेत. मात्र परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा कल संपला आहे. होतकरू विद्यार्थी मात्र परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. अजून परीक्षा किती लांबणार, त्याऐवजी अन्य परीक्षेप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

ग्रामीण भागापासून शहरातील कोरोनाचे वाढते रुग्ण, तर दुसरीकडे तीव्र उन्हाळा असतानाही पाचवी व आठवीची मुले त्यांच्या वर्गात परीक्षा न देताच पास झाली असली तरी, शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागत आहे.

अनेक शाळांतून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वर्षभर मुलांकडून तयारी करून घेण्यात येते. यावर्षी ऑनलाईन अध्यापन असतानाही शाळांनी मुलांची प्रत्यक्ष, ऑनलाईन तयारी करून घेतली आहे. अशा मुलांना गुणवत्ता सिध्द करण्याची संधी असल्याने सतत परीक्षा पुढे करण्याच्या निर्णयामुळे मुले निराश झाली आहेत.

कोट

सतत दोन वेळा शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. एक तर अन्य परीक्षेप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करावी अन्यथा पुढची तारीख घोषित करावी.

- दीपक नागवेकर,

जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ़

प्रतिक्रिया

१) वर्षभर आम्ही अभ्यास करीत आहोत. शाळेचा अभ्यास नसला तरी शिष्यवृत्तीचा सराव सुरू आहे. शिष्यवृत्तीचा अभ्यास बंद केला तर आतापर्यंतच्या मेहनतीवर पाणी फेरणार आहे. त्यामुळे परीक्षेची तारीख जाहीर करावी.

- अथर्व नार्वेकर, विद्यार्थी.

२) शिष्यवृत्ती परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. आता किमान तारीख तरी जाहीर करून किमान शाळास्तरावर नियोजन करण्यात यावे. परीक्षेबाबत योग्य व ठोस नियोजन करणे गरजेचे आहे.

- सुप्रिया गडदे, विद्यार्थी

Web Title: The date for the scholarship examination is yet to be decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.