ज्ञानाच्या मंदिरात विजेचा अंधार

By Admin | Updated: July 26, 2015 00:01 IST2015-07-25T23:56:06+5:302015-07-26T00:01:18+5:30

महावितरण : ८0 शाळांचा पुरवठा खंडित

Darkness of light in the house of knowledge | ज्ञानाच्या मंदिरात विजेचा अंधार

ज्ञानाच्या मंदिरात विजेचा अंधार

रत्नागिरी : शाळांचे वीजबील भरण्यासाठी शासकीय निधीची तरतूद नसल्यामुळे जिल्ह्यातील ८० शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. एकीकडे शासन ‘ई’ लर्निंग प्रणालीची अमंलबजावणी करीत असताना दुसरीकडे मात्र विजेअभावी शाळेतील संगणक शोभेचे बाहुले बनले आहेत.
ज्या ठिकाणी शिक्षणाव्दारे विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमय केले जाते, त्या शाळांमध्ये महावितरणच्या विजेने मात्र अंधार केला आहे. शासनाच्या चार टक्के सादील योजनेतंर्गत शाळांना निधी दिला जातो. त्यातून वीजबिल, पाणी बिल भरणे अशक्य होत आहे. पूर्वी शाळांना घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात येत असल्याने शाळांना ३.३६ रूपये प्रतियुनिट दराने वीजपुरवठा करण्यात येत होता. मात्र आता शाळांना वाणिज्यिक दराने वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शाळांना प्रति युनिट ५.३८ पैसे दराने विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे वाढीव वीज बील भरणे शाळांना अशक्य झाले आहे.
दैनंदिन शालेय जीवनापासून संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी सर्व शाळा संगणकीकृत करण्यात आल्या आहेत. शिवाय ई लर्निंगचे धडेही विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. जिल्ह्यात २७४६ प्राथमिक शाळा असून ८० शाळांचा वीजपुरवठा बील न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान देण्यासाठी आणलेले संगणक शोभेच्या बाहुल्याप्रमाणे कोपऱ्यात धूळ खात पडले आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतून ई-लर्निग उपक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र विजेअभावी हा उपक्रमापासून ८० शाळा वंचित राहणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती सुरू आहे. पालकांचाही खासगी शाळांकडे वाढता कल आहे. शासन या शाळांतील विद्यार्थी गळती रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. असे असताना विजेचा प्रश्नदेखील शाळांपुढे उभा ठाकला आहे. यावर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन योग्य तोडगा काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांमधून होत आहे.(प्रतिनिधी)
 

Web Title: Darkness of light in the house of knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.