दापोली मतदार संघासाठी ५० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:11+5:302021-04-25T04:31:11+5:30
खेड : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या, अपुरे ऑक्सिजन बेड आणि रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन ५० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन ...

दापोली मतदार संघासाठी ५० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर देणार
खेड : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या, अपुरे ऑक्सिजन बेड आणि रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन ५० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन आपल्या आमदार फंडातून उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खेड पंचायत समितीच्या सभापती निवासात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड, ऑक्सिजन बेड, बीएएमएस डॉक्टर व नर्सेस यांची कमतरता आहे. ऑक्सिजनची समस्या सोडविण्यासाठी आमदार फंडाच्या माध्यमातून मोठमोठ्या शहरातील हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारे ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका मशीनची किंमत ९५ हजार रुपये रुपये असून, यासाठी सुमारे ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या मशीन खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यांसाठी आणणार असून, येत्या दोन दिवसांत त्या उपलब्ध होतील. या योजनेची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना दिली असून, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यासाठीही अशा ४० मशिन्सची ऑर्डर दिली आहे.
जिल्ह्यात एकून ९० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन येत्या दोन दिवसांत उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल होणार नाहीत. या मशीनची किंमत ९५ हजार रुपये आहे. हे मशीन हवेतून ऑक्सिजन तयार करते. एका वेळेला एक रुग्णासाठी एका मिनिटाला हे मशीन तब्बल १० लीटर ऑक्सिजन तयार करून पुरवते. त्यामुळे आता बाजारातील ऑक्सिजनवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. राज्यातील इतर आमदारांनाही याबाबत माहिती दिली असून, त्यांनीही त्यांच्या मतदार संघात अशा प्रकारे मशीनची खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.