दापोलीत संजय कदम ‘जायंट किलर’

By Admin | Updated: October 21, 2014 23:43 IST2014-10-21T22:27:32+5:302014-10-21T23:43:29+5:30

तीन वर्षापूर्वी बंड : प्रस्थापित सूर्यकांत दळवींच्या साम्राज्याला जोरदार धक्का

Dapoli Sanjay Kadam 'Giant Killer' | दापोलीत संजय कदम ‘जायंट किलर’

दापोलीत संजय कदम ‘जायंट किलर’

शिवाजी गोरे- --प्रमुख पक्ष यावेळी स्वतंत्र लढल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लढती अटीतटीच्या होत्या. असे असले तरीही दापोली विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा सर्वात सुरक्षित व बालेकिल्ला असल्याचे बोलले जात होते. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी ५ वेळा निवडून जाण्याचा भीमपराक्रम केला होता. यावेळी ते षटकार मारणार असा सर्वांचाच अंदाज होता. सेनेच्या या जागेबाबत कुणालाही भीती नव्हती. मात्र त्यांचा पराभव करणारे राष्ट्रवादीचे नवखे तरूण उमेदवार संजय कदम खऱ्या अर्थाने कदम जायंट किलर ठरले आहेत.
दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेला लोकसभा निवडणुकीतच धोक्याची घंटा वाजली होती. शिवसेना खासदार अनंत गीते यांना गेल्या वेळी दापोली विधानसभेतून ४८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीत अनंत गीते यांना जिंकण्यासाठी फार झगडावे लागले. शेवटच्या क्षणाला कुणबी समाजाचे कार्ड वापरल्याने त्याचा निसटता विजय झाला. मात्र दापोली विधानसभा मतदार संघातील ४८ हजारांचे मताधिक्य १४ हजार मतावर येवून ठेपल्याने अनंत गीते कुणबी समाजाचे असूनसुद्धा मतदारांनी त्यांना नाकारले हे सिद्ध झाले होते. अनंत गीते यांचे घटलेले मताधिक्य पाहून तरी वेळीच सावध होण्याची गरज असतानासुद्धा केवळ शिवसेना, भगवा झेंडा याभोवती भावनिक राजकारण सुरु ठेवले गेले.
दापोली तालुक्यातील मतदार खेडच्या उमेदवाराला स्वीकारणार नाही हा फाजील आत्मविश्वास सेनेला नडला तर दुसरीकडे पक्षांतर्गत गटतटात तालुका सेना गुंतली होती. त्यामुळे विकास कामे व जनसंपर्काकडे दुर्लक्ष होत गेले. निवडणुकीच्या तोंडावर नारळ फोडणे व पुढील पाच वर्षासाठी मतदाराकडे झोळी पसरणे हा राजकीय हेतू ठेवून भूमिपूजनाचा सपाटा लावायचा परंतु प्रत्यक्षात मात्र विकास कामांच्या नावाने निष्क्रियपणा दाखवायचा हा प्रकार अलिकडे वाढला असल्याचे प्रत्येक गावात बोलले जात होते. परंतु उघडपणे बोलून कोणी रोष पत्करायला तयार नव्हते. केवळ निवडणुकीपुरत्या आश्वासनांना जनता कंटाळली होती. त्याचाच उद्रेक मतपेटीतून झाला.
दरम्यानच्या काळात जनता सक्षम पर्याय शोधत होती. परंतु सक्षम विरोधक न मिळाल्याने स्थानिक राजकारणापासून रामदास कदम यांनी लक्ष काढून घेतल्याने दापोलीच्या राजकारणात सर्व काही अलबेल होते. एक वर्षापूर्वी दसऱ्यादरम्यान रामदास कदम यांनी दाभोळ चंडिकेचे दर्शन घेण्यासाठी दापोलीत एन्ट्री केली व अनेकांच्या भुवया उंचावल्या. रामदास कदम यांनी आपण दापोलीतून इच्छुक असल्याचे वक्तव्य करुन अनेकांना धक्का दिला. सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. रामदास कदमांची एंट्री पालगड गटाचे जि.प. सदस्य राजेंद्र फणसेंमुळेच झाली असा ठपका ठेवून त्यांना डावलण्यात येत असल्याचे वारंवार उघड झाले. फणसे यांचे विरोधात पालगड येथे त्यानंतर दापोली येथे सभा घेऊन फणसे प्रकरण चर्चेचे गुऱ्हाळ बनले होते. या सर्व प्रकरणात सेना अडकली असताना राष्ट्रवादीने आपला जनसंपर्क सुरुच ठेवला होता.
सेनेतून बाहेर पडलेले किशोर देसाई राष्ट्रवादीत आले व राष्ट्रवादी खऱ्या झंजावाताची सुरुवात झाली. सेना स्टाईलने त्यांना पक्षाच्या माध्यमातून गावागावात पक्ष बांधणी केली. पक्ष वाढला परंतु सेनेला शह देण्याएवढी देसाईकडे ताकद नव्हती. परंतु ३ वर्षापूर्वी दळवी यांच्या विरोधात बंड करुन शिवसेनेतून कदम यांनी बाहेर पडून शक्तीप्रदर्शन घडविले व कदम यांनी जायंट किलरची भूमिका निभावली.

Web Title: Dapoli Sanjay Kadam 'Giant Killer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.