दापोलीतील सोडतीत अनेकांना दिलासा
By Admin | Updated: July 2, 2016 23:45 IST2016-07-02T23:45:03+5:302016-07-02T23:45:03+5:30
नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१६-१७ ची आरक्षण सोडत

दापोलीतील सोडतीत अनेकांना दिलासा
दापोली : दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१६-१७ ची आरक्षण सोडत आज दापोलीचे प्रांताधिकारी जयराम देशपांडे, मुख्याधिकारी संजिवनी दळवी, नायब तहसीलदार संजय कोरवी यांचे उपस्थितीत पार पडले. या आरक्षण सोडतीत अनेकांना दिलासा मिळाला तर काहींना मतदारसंघ गमावण्याची वेळ आली आहे.
दापोली नगरपंचायतीत एकूण १७ प्रभाग आहेत. प्रभागनिहाय आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे - दापोली नगरपंचायतीच्या आरक्षण सोडतीने काही विद्यमान नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. तसेच काहींना मात्र मतदारसंघ गमावण्याची वेळ आल्याने दुसऱ्या प्रभागातून चाचपणी सुरु होईल. आरक्षण सोडत होताच आता भेटीगाठींना वेग येणार असून, दापोली नगरपंचायत निवडणुकीला राजकीय रंग चढणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष जावेद मणियार, उपनगराध्यक्ष सचिन जाधव, नगरसेविका जया साळवी, विद्या बुरटे, विजया शिगवण, वनिता शिगवण, संचिता जोशी, प्रेरणा मोरे, गौरी शिर्के यांना आरक्षण सोडतीत दिलासा मिळाला आहे. विद्यमान नगरसेवक सचिन गायकवाड, नितीन शिंदे यांनासुद्धा दिलासा मिळाला आहे. विद्यमान नगरसेवक खालीद रखांगे, नादिर रखांगे यांना लगतचा मतदारसंघ निवडण्याची वेळ आली आहे. दापोली नगरपंचायत सोडतीने राजकारणाची दिशा निश्चित झाली असून, प्रभाग क्र.१६ अनुसुचित जातीकरिता राखीव पडल्याने माजी उपनगराध्यक्ष भाऊ मोहिते पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता असून, या प्रभागातून ते आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उभे करतील, असे चर्चिले जात आहे.
अहमदनगर (सर्वसाधारण), आझादनगर (स्त्री राखीव), भारतनगर (स्त्री राखीव), वरची बुरुडआळी (नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण), बुरुडआळी बौद्धवाडी (सर्वसाधारण), चोरगेवाडी काळकाईकोंड (स्त्री राखीव), खोंडा (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव), प्रभूआळी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), गाडीतळ (नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण), पोष्टआळी (सर्वसाधारण), कोकंबाआळी (सर्वसाधारण), फॅमिली माळ (स्त्री राखीव), फॅमिली माळ (स्त्री राखीव), शिवाजीनगर (सर्वसाधारण), उदयनगर (स्त्री राखीव), नांगरबुडी (अनुसुचित जाती सर्वसाधारण), वडाचा कोंड (नागरिकांचा मागास प्रवर्ग). (प्रतिनिधी)