'दापोलीत दळवींना धक्का

By Admin | Updated: October 20, 2014 00:44 IST2014-10-19T23:59:23+5:302014-10-20T00:44:46+5:30

षटकार चुकला : रत्नागिरी, राजापूर, चिपळूण शिवसेनेकडे; चार विद्यमान पुन्हा विधानसभेत

'Dapoli pushing the Dalvi | 'दापोलीत दळवींना धक्का

'दापोलीत दळवींना धक्का

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्ष प्रथमच स्वबळावर लढल्यानंतरही रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांचा कौल कायमच राहिला. जिल्ह्यात शिवसेना तीन, तर राष्ट्रवादी दोन जागी विजयी झाल्याने याआधीचे पक्षीय बलाबल कायम राहिले आहे. दापोली मतदारसंघातून विजयाचा षटकार मारण्याच्या तयारीत असलेले शिवसेनेचे सूर्यकांत दळवी हे जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांच्याकडून झेलबाद झाले, तर पक्षांतर केलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री उदय सामंत रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेकडून विजयी झाले. राजापुरात शिवसेनेचे राजन साळवी, चिपळुणात शिवसेनेचे सदानंद चव्हाण आणि गुहागरात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी आपापले गड राखले.
जिल्ह्यातील पहिला निकाल गुहागर मतदारसंघातून जाहीर करण्यात आला. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे भास्कर जाधव (७२,५२५) यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे डॉ. विनय नातू (३९,७६१) यांचा तब्बल ३२,७६४ मतांनी पराभव केला.
चिपळूणची जागा शिवसेनेने स्वत:कडेच राखली. या ठिकाणी सदानंद चव्हाण हे पुन्हा विजयी झाले. त्यांना राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी कडवी झुंज दिली. त्यामुळे शेवटच्या पाच फेऱ्यांपर्यंत उत्कंठा लागून राहिली होती. सदानंद चव्हाण यांना ७५,६९५ तर शेखर निकम यांना ६९,६२७ मते मिळाली.
रत्नागिरी मतदारसंघात राष्ट्रवादीतून शिवसेनेच्या गोटात दाखल झालेल्या उदय सामंत यांनी भाजपचे बाळ माने यांचा ३९,४२७ मतांनी पराभव केला. उदय सामंत यांना ९३,८७६ तर बाळ माने यांना ५४,४४९ मते मिळाली.
राजापूर मतदारसंघात शिवसेनेच्या राजन साळवी यांनी काँग्रेसच्या राजन देसाई यांचा ३९,०६२ मतांनी पराभव केला. साळवी यांना ७६,२६६ तर देसाई यांना ३७,२०४ मते मिळाली.
अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार व जिल्हा परिषद सदस्य संजय कदम यांनी शिवसेनेचे पाचवेळा आमदारकी भूषवणाऱ्या सूर्यकांत दळवी यांना अनपेक्षितपणे नमवत विजयश्री
खेचून आणली. या ठिकाणी अटीतटीची लढत झाली. त्यात कदम ३,६४३ मतांनी विजयी झाले. कदम यांना ५२,५९५ तर दळवी यांना ४८,९५२ मते मिळाली. या ठिकाणी राष्ट्रवादीत बंडखोरी होऊनही कदम यांनी आमदारकी मिळवली. (प्रतिनिधी)

विजय तोच, जागा बदलली
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील यशावर नजर टाकल्यास मागील निवडणुकीच्या तुलनेत पक्षीय बलाबल याही निवडणुकीत कायम राहिले. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी दोन, तर शिवसेना तीन, असे पक्षीय बलाबल होते. ते कायम राहिले आहे. मात्र, मागील निवडणुकीत रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीकडे, तर दापोलीची जागा शिवसेनेकडे होती. या निवडणुकीत या दोन मतदारसंघातील पक्ष बदलले आहेत.
भाजपच्या
पदरी भोपळा
जिल्ह्यातील भाजपच्या पाचही उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचारसभा रत्नागिरी येथे घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही भाजपच्या पदरी निराशाच आली. जिल्ह्यात भाजपला आपले खातेही उघडता आले नाही.

Web Title: 'Dapoli pushing the Dalvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.