दापोली नगरपंचायतीचा डंपिंग गाऊंड प्रश्न निकाली
By Admin | Updated: December 13, 2015 01:13 IST2015-12-13T00:49:31+5:302015-12-13T01:13:52+5:30
प्रतीक्षा संपली : शहराचा कचरा जाणार आता हक्काच्या जागेत

दापोली नगरपंचायतीचा डंपिंग गाऊंड प्रश्न निकाली
शिवाजी गोरे ल्ल दापोली
दापोली शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यासाठी नगरपंचायतीला गेली १५ वर्षे जागेची प्रतीक्षा होती. शहरातून कचऱ्याला होणारा वाढता विरोध पाहता कचऱ्याचे करायचे काय ही डोकेदुखी नगरपंचायतीची होती. भाडेतत्वावर घेतलेल्या चिरेखाणीत कचऱ्याचे डंपिंग केले जात होते. परंतु, त्या भागातील वाढता विरोध पाहता दिवसाला १० टन निघणाऱ्या कचऱ्याचे करायचे काय हा प्रश्न नगरपंचायतीपुढे होता. मात्र, आता नगरपंचायतीचा कचरा हक्काच्या जागेत जाणार असून, त्यासाठी ६ एकर जागा नगरपंचायतीने खरेदी केली आहे.
दापोली नगरपंचायतीच्या स्थापनेपासून शहरातील कचरा समस्या ही डोकेदुखी बनली होती. अनेकवेळा याच कचऱ्याचे भांडवल करुन विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडत होते. दरवर्षी लाखो रुपये भाडे देऊन नगरपंचायत खासगी जागेतील चिरेखाणीत कचरा टाकून तो जाळण्याचे काम करत होती.
यावेळी चंद्रनगर, टाळसुरे, आपटी, बोरघर या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खासगी जागेचा वापर करण्यात आला. परंतु, या सर्वच ठिकाणी नगरपंचायतीच्या कचऱ्याला त्या भागातील नागरिकांचा प्रखर विरोध झाला. आजूबाजूच्या गावातून विरोध झाल्याने नगरपंचायतीला आपल्या हद्दीतच कचरा डंपिंग करावा लागला. परंतु, या कचऱ्यामुळे शहरातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे भांडवल करुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले होते. त्यामुळे दापोली नगरपंचायत राजकारणात डंपिंग ग्राऊंड राजकारणाचा विषय बाजूला होता.
डंपिंग ग्राऊंडचा मुद्दा पुढे करुन अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यातही याला स्थान दिले होते. त्यामुळे गेली १५ वर्षाहून अधिककाळ सतत गाजत असणारा व विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करण्याची संधी मिळणारा डंपिंग ग्राऊंडचा मुद्दा निकाली काढण्यात दापोली नगरपंचायतीला यश आले आहे. दापोली शहरापासून अवघ्या दोन कि. मी. अंतरावर ६ एकर जागा नगरपंचायतीला सरकारी दरात मिळाल्याने गेली १५ वर्षे भिजत पडलेल्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे.
दापोली नगरपंचायतीने यापूर्वीच ओला कचरा मार्गी लावणारा प्रकल्प सुरु केला आहे. आता शहरातील सुक्या कचऱ्याचा प्रश्नदेखील निकाली निघाला असून, सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे युनिटसुद्धा बसवण्यात येणार आहे.
शहराबाहेर असणाऱ्या या डंपिंग ग्राऊंडसमोर २० गुंठे जागा ग्रीन झोनसाठी आरक्षित ठेवण्यात आली असून, या २० गुंठे जागेत कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. डंपिंग ग्राऊंडसाठी पुरेशी जागा उपलब्ध झाल्याने दापोली शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सध्या तरी निकाली निघाला आहे.