बंद दवाखान्यांमुळे दापोलीत प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू
By Admin | Updated: October 5, 2014 23:05 IST2014-10-05T21:55:45+5:302014-10-05T23:05:17+5:30
तिन्ही दवाखानेही बंद असल्याचे कळले

बंद दवाखान्यांमुळे दापोलीत प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू
दापोली : निवडणुकीचे प्रशिक्षण घेत असताना छातीत दुखू लागल्याने प्रशिक्षण अर्धवट सोडून निघालेल्या एका प्राथमिक शिक्षकाचा दापोलीतील सर्व दवाखाने बंद असल्यामुळे उपचाराअभावी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. अशोक गोटे (मूळ नगर, सध्या रुपनगर, दापोली) हे कुडावळे शाळा नं. १ भोईटवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. रविवारी सकाळी रसिकरंजन सभागृहात या शिक्षकाचे निवडणूक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. गोटे यांच्या सकाळपासूनच छातीत दुखत होते. मात्र, त्यांनी आजाराकडे दुर्लक्ष करीत प्रशिक्षण केंद्र गाठले.
प्रशिक्षण सुरु असताना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत पुन्हा दुखू लागले. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अन्य एका प्राथमिक शिक्षकाला जोडीला घेऊन ते निघाले. दापोलीत हृदयविकार तज्ज्ञांचे दोन दवाखाने बंद होते. त्यामुळे ते दोघे तिसऱ्या दवाखान्यात आले. त्यावेळी डॉक्टर घरी असतानाही ते नसल्याचे सांगण्यात आले. तिन्ही दवाखानेही बंद असल्याचे कळले आणि त्याच ठिकाणी गोटे हे खाली कोसळले. मात्र, थोड्याच वेळात या दवाखान्यातील डॉक्टर त्या ठिकाणी हजर झाले व त्यांनी गोटे यांना मृत घोषित केले. उपचाराअभावी झालेल्या शिक्षकाच्या या मृत्यूमुळे दापोलीवर शोककळा पसरली आहे. (प्रतिनिधी)