औषध विक्रेत्यांची झाडाझडती

By Admin | Updated: September 18, 2014 23:22 IST2014-09-18T22:20:20+5:302014-09-18T23:22:19+5:30

खेडमध्ये ग्राहकांची बाजू पंचायतीतर्फे मांडण्याचा प्रयत्न

Dangers of Drug Dealers | औषध विक्रेत्यांची झाडाझडती

औषध विक्रेत्यांची झाडाझडती

खेड : शहरातील औषध विक्रेत्यांची सहा महिन्यांनी तपासणी करणे आवश्यक आहे़ अनेक वेळा या तपासणीत काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. आजही काही औषध दुकानांमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात आहे. याला आळा घालावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधी लवकरच अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या वर्षी या दुकानांची तपासणी करण्यात आली होती. यावेळी काही दुकानांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली होती. मात्र, ये रे माझ्या मागल्या, अशी काहीशी गत झाली आहे़ खेड आणि भरणे नाका येथील काही औषध दुकानांमध्ये मनमानी सुरू आहे. अनेक दुकानांमध्ये आजही छापील किमतीपेक्षा जास्त दराने पैसे घेतले जातात. घाईघाईमध्ये मिळेल त्या किमतीमध्ये औषध घेऊन घरी परतण्याच्या मनस्थितीत ग्राहक असतो. पावती न घेता गरज म्हणून तो पावतीकडे दुर्लक्ष करतो. मागणी केल्याखेरीज औषध विक्रेत्यांकडून पावती मिळत नाही़ पावती हवी असेल तर व्हॅट आकारावा लागेल, असे सांगण्यात येते.
खेड व भरणेनाका येथील औषध दुकानांमध्ये मुळ किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणारे औषधे विक्रेते आढळून आल्याने खळबळ उडाली. ते प्रकरण ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडे नेले होते. यानंतर दुकानदाराने कबूल केल्यानंतर ते मिटले होते. मात्र त्यानंतरही हे प्रकार सुरू असल्याने अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेण्याचे निश्चित केले असल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Dangers of Drug Dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.