राज्य बालनाट्य स्पर्धेत दामले विद्यालयाला तब्बल पाच पारितोषिके

By Admin | Updated: January 14, 2015 00:39 IST2015-01-14T00:05:41+5:302015-01-14T00:39:48+5:30

सावित्रीची लेक : पाचजणांनी मिळवली वैयक्तिक पारितोषिके, कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर

Damle Vidyalaya has won five prizes in the State Ballet Championship | राज्य बालनाट्य स्पर्धेत दामले विद्यालयाला तब्बल पाच पारितोषिके

राज्य बालनाट्य स्पर्धेत दामले विद्यालयाला तब्बल पाच पारितोषिके

रत्नागिरी : शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाच्या ‘सावित्रीची लेक’ या बालनाट्याला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्राच्या प्राथमिक ेफेरीत तब्बल पाच वैयक्तिक पारितोषिके प्राप्त झाली आहेत. यामध्ये अभिनयाच्या तीन पारितोषिकांसह नेपथ्य व प्रकाश योजनेसाठी प्रथम क्रमांक प्राप्त पारितोषिकांचा समावेश आहे. यशाबद्दल शाळेवर सर्व थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे कोल्हापूर व पुणे येथे २ ते ९ जानेवारी दरम्यान ३८ नाट्यप्रयोग सादर झाले. यामध्ये कोल्हापूर येथे दामले विद्यालयाने शाळेचे शिक्षक योगेश कदम यांनी लिहिलेल्या ‘सावित्रीची लेक’ या बालनाट्याचे सादरीकरण केले. गरीब आणि अशिक्षित वडिलांचा मुलीच्या जन्माला, शिक्षणासाठी असणारा कडाडून विरोध आणि त्याविरोधात मुलीच्या शिक्षणासाठी लढणारी त्यांची बायको, तसेच शिक्षणाची आस असणारी मुलगी यांच्या जीवनावर भाष्य करणारे हे बालनाट्य आहे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलीच्या शिक्षणासाठी धैर्याने उभ्या राहणाऱ्या सावित्रीचे महत्त्व या बालनाट्यातून मांडण्यात आले.
स्पर्धेत सुकन्या शिंदे, सीमा दसाणा आणि निरंजन सागवेकर या विद्यार्थ्यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत. याशिवाय शाळेचे शिक्षक रवींद्र शिंदे यांना उत्कृष्ट नेपथ्यासाठी प्रथम क्रमांकाचे ५ हजार रुपयांचे पारितोषिक, तर प्रकाशयोजनेसाठी प्रथम क्रमांकाचे ५ हजार रुपयांचे पारितोषिक या बालनाट्यासाठी अजिंक्य केसरकर यांना प्राप्त झाले आहे. या बालनाट्याला यापूर्वी रत्नागिरी नगर परिषदेतर्फे आयोजित बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता. त्याचप्रमाणे मालवण येथे झालेल्या कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित बालनाट्य स्पर्धेत याच बालनाट्याने अभिनय, दिग्दर्शनासह द्वितीय क्रमांक पटकावला होता.
या बालनाट्यात निरंजन सागवेकर, सुकन्या शिंदे, सीमा दसाणा, रोनक साळवी, साक्षी देसाई, साहील चव्हाण, श्रेयश काटकर, अमेय अणावकर, स्वप्नाली आखाडे, रिक्ता मोरे, प्रफुल्ल पाटील, सिया शिंदे, तन्वी पवार, निरंजन तेंडुलकर, साईराज आखाडे, श्रद्धा साटविलकर, साक्षी कांबळे, यश माने, हर्षवर्धन कदम या विद्यार्थ्यांनी भूमिका पार पाडल्या. या बालनाट्यासाठी योगेश कदम (लेखक), शाहबाज गोलंदाज (दिग्दर्शक), अजिंक्य केसरकर (प्रकाशयोजना), रवींद्र शिंदे (नेपथ्य), साई शिर्सेकर (पार्श्वसंगीत), दीपक सागवेकर, संदीप पवार (रंगभूषा), जयश्री तरळ, पूर्वा मिरकर, शीतल पवार (वेशभूषा) यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांच्यासह पालकांनी विशेष मेहनत घेतली. या यशाबद्दल नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, शिक्षण सभापती शिल्पा सुर्वे, नगरसेवक सुदेश मयेकर, डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता सुशील शिवलकर, दीपा सावंत, नगर परिषद शिक्षण मंडळ सभापती मंजिरी साळवी, प्रशासन अधिकारी आर. एम. जारवाल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुुंडलिक कांबळे यांनी शाळेचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Damle Vidyalaya has won five prizes in the State Ballet Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.