अतिवृष्टीत दापोली तालुक्याचे कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST2021-09-18T04:33:48+5:302021-09-18T04:33:48+5:30
दापोली : दापोली तालुक्यात ७ व ८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या ढगफुटीमुळे पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. या ...

अतिवृष्टीत दापोली तालुक्याचे कोटींचे नुकसान
दापोली : दापोली तालुक्यात ७ व ८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या ढगफुटीमुळे पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. या दाेन दिवसात तब्बल ४४७ मिलीमीटर पावसाची नाेंद झाल्याची माहिती डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाने दिली आहे. या अतिवृष्टीत शहर व जालगाव परिसरात जवळपास कोटींचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील कळंबट येथील दोन घरांचे नुकसान होऊन ५१,७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गोठ्याचे २१,५०० रुपयांचे नुकसान झालेले आहे. दापोली शहरातील व जालगाव गावातील सात दुकानांचे ४ लाख ४४ हजार रुपयांचे तर जालगाव व शहरातील ९६ नागरिकांच्या घरातील भांडी व इतर साहित्याचे जवळपास ६४ लाख ७४ हजार तर, ४५ गाड्यांचे नुकसान होऊन ३४ लाख ६६ हजारांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर लाडघर मार्गावर दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. तसेच सारंग या ठिकाणी रस्ता खचला होता. दापोली शहरालगत व जालगाव गावात खलाटी भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरून ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. हा भाग खोलगट असल्यामुळे पाणी भरपूर पाऊस पडल्यावर भरते, मात्र ही परिस्थिती कमी असते.
---------------
दापोली शहरातील जोग नदीला पूर येतोच, पण पाणी रस्त्यावर येत नाही. अशी घटना फार वर्षांपूर्वी नाल्याजवळ लाकडाचे ओंडके आले होते त्यामुळे घडली होती. परंतु, त्यानंतर अशी परिस्थिती प्रथमच आली आहे. याचे कारण म्हणजे शिवस्मारक येथील नाला साफ न केल्याने पाणी आले आहे.
- संदीप केळस्कर, शहराध्यक्ष, भाजप
-------------------------
महसूलच्या अधिकाऱ्यांची जालगावला भेट
उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पावसातच आपत्तीग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली हाेती. दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनीही आपत्तीग्रस्त भागाला समक्ष भेट देऊन पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्रुप ग्रामपंचायत जालगावच्या सरपंच श्रुती गोलांबडे, उपसरपंच विकास लिंगावले, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम इदाते, सदस्य यांच्यासह कर्मचारी यांनी या भागात मदत कार्य केले.
---------------------
शेतीच्या नुकसानाची चाचपणी
दापोलीत झालेल्या मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे शेतीचे अधिक नुकसान झाले आहे. नदी किनारी असलेल्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, अद्याप या नुकसानाची आकडेवारी अजूनही समाेर आलेली नाही. मात्र, कृषी विभागाकडून गावोगावी चाचपणी सुरु असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. त्याचबरोबर शेतीचे, झाडांचे फार नुकसान झालेले नसल्याचा अंदाज देखील कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे.