वादळामुळे रामपूरमध्ये नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:27+5:302021-05-25T04:35:27+5:30
भराव हटविल्याने धोका टळला चिपळूण : पावसाळा तोंडावर असतांना बहाद्दूरशेख येथील वाशिष्ठी पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे ...

वादळामुळे रामपूरमध्ये नुकसान
भराव हटविल्याने धोका टळला
चिपळूण : पावसाळा तोंडावर असतांना बहाद्दूरशेख येथील वाशिष्ठी पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे सर्व गर्डर चढवून झाल्याने नदीतील भराव काढण्यात आला आहे. नदीचे पाणी तेथून प्रवाहित होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणारा धोका टळला असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नदीतील भराव पावसाळ्यापूर्वी काढावा, अशी मागणी पर्यावरण प्रेमी शौकत मुकादम यांनी केली होती. आता हा भराव काढण्यात आला आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
रस्त्याचे डांबरीकरण करा
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील ४४ किलोमीटर लांबीचा रस्ता चौपदरीकरणाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होईल, अशी ग्वाही कल्याण टोल कंपनीच्या ठेकेदाराने दिली होती. पण, ही ग्वाही म्हणजे निव्वळ धूळफेक होय. याच मार्गावर भोस्ते घाट व गणपती कृपा हॉटेलसमोर पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता म्हणजे अपघाताला आमंत्रण देणारा ठरणार आहे. पाऊस तोंडावर आलेला आहे. म्हणून पर्यायी रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी युवा सेनेचे कौशल चिखले यांनी केली आहे.
घारीला जीवनदान
दापोली : येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे हे खेडमधून दापोलीकडे येत असताना रस्त्यामध्ये जखमी अवस्थेत त्यांना घार दिसून आली. त्या घारीला त्यांनी दापोलीत आणून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घेतली. वेळीच या घारीला औषधोपचार मिळाल्यामुळे तिचा जीव वाचला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचे कौतुक होत आहे.
रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
दापोली : येथील अनुबंध या संस्थेतर्फे खानबहादूर मेमोरियल हॉस्पिटलला कोरोना काळात गरीब रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला. तसेच हे यंत्र कसे चालवायचे, याचे प्रात्यक्षिकदेखील दाखविण्यात आले. यावेळी डॉ. अनिरूध्द डोंगरे, वरूण वालावलकर, ओंकार कर्वे, डॉ. मुनिर सरगुरोह आदी उपस्थित होते.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
चिपळूण : रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २९ गावे असून, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. आतापर्यंत ३५० रुग्ण बरे झाले असून, सध्या ६४ बाधित रुग्ण आहेत. २५०० नागरिकांनी लस घेतली आहे, अशी माहिती डॉ. निकिता शिर्के यांनी दिली. काेराेनातून रुग्ण बरे हाेत असल्याने ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला आहे़
चिपळूण - मुंबई बस सेवा सुरू
चिपळूण : राज्य शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊनच्या काळात येथील आगारातील काही मोजक्याच फेऱ्या सुरु होत्या. हळूहळू ग्रामीण भागातील फेऱ्या वाढविण्यात येत असून, आज सोमवारी सकाळी १० वाजता चिपळूण - मुंबई ही एस. टी.ची पहिली बस सोडण्यात आली. काही दिवसातच पुणेसाठीही बस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी दिली.
रुग्णांना साहित्य वाटप
खेड : येथील स्टेट बँकेचे शाखाधिकारी नीलेश तांबे यांनी शहरातील दोन कोविड सेंटरमधील ११० रुग्णांना पाणी बॉटल्स, फ्रुटी व बिस्कीट किटचे वाटप केले. शाखाधिकारी तांबे यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांना मदतीचा हात दिला होता. दुसऱ्या लाटेतही नगर परिषदेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या ३५ रुग्णांना, तर शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या कोविड सेंटरमधील ६५ रुग्णांना किटचे वाटप केले.
टँकरने पाणीपुरवठा
खेड : तालुक्यात तौक्ते चक्रीवादळानंतर सलग चार दिवस झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे टंचाईग्रस्त गाव - वाड्यांची संख्या स्थिरावलेली असतानाच ऐनवली - बंगालवाडीत पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. याठिकाणी शनिवारपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीत १९ गावे ३५ वाड्यांना एक शासकीय व ४ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.