दहीहंडीला गालबोट, एकाचा मृत्यू
By Admin | Updated: August 18, 2014 23:33 IST2014-08-18T22:47:00+5:302014-08-18T23:33:51+5:30
दापोलीत प्रौढाचा मृत्यू, रत्नागिरीत एक जखमी, इतरत्र उत्साहात

दहीहंडीला गालबोट, एकाचा मृत्यू
रत्नागिरी : गोविंदा रे गोपाळा... यशोदेच्या तान्हा बाळा...’ या गाण्याच्या तालावर जिल्हाभरात जल्लोष सुरू असताना दापोली आणि रत्नागिरीतील दुर्घटनांनी गोपाळकाल्याला गालबोट लावले. दापोली तालुक्यातील नानटे गावी दहीहंडी फोडताना पडून बबन उमासरे (५७) यांचा मृत्यू झाला तर रत्नागिरीत परटवणे विभागात दहीहंडी फोडताना अमृत शिर्के (२७) हा तरूण खाली पडून जखमी झाला.
हंडी फोडताना गंभीर जखमी झालेल्या बबन उमासरे यांना तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री ८.३० वाजता मृत्यू झाला. रत्नागिरीत जखमी झालेल्या शिर्के या तरूणाला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक व खासगी मिळून ३५६० दहीहंड्या फोडण्यात आल्या. राजकीय पक्षांनीही काही दहीहंड्या पुरस्कृत केल्या होत्या. बक्षिसे मिळविण्यासाठी बाहेरगावहून अनेक गोविंदा पथके खास गाड्या करून आली होती. रत्नागिरी जिल्ह्यात ३९२ सार्वजनिक, तर ३१६९ खासगी दहीहंड्या रात्री उशिरापर्यंत फोडण्यात आल्या.
रत्नागिरीत मारूती मंदिर, साळवी स्टॉप, नाचणे, मध्यवर्ती बसस्थानक, मांडवी किनाऱ्यावरील दहीहंडी पाहण्यासाठी विशेष गर्दी केली होती. दहीहंडीच्या ठिकाणी सर्वत्रच खास गोविंदाची गाणी वाजत होती. अनेक ठिकाणी अपार्टमेंटमध्ये बालगोपालही दंहीहंडीचा आनंद घेत होते. (प्रतिनिधी)