दाभोलकर हत्येप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:50+5:302021-08-21T04:36:50+5:30

रत्नागिरी : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या सूत्रधारांना पकडण्यात गेली आठ वर्षे सरकारला अपयश येत आहे. याबाबत शासनाला आठवण ...

Dabholkar murder case: Anti-Superstition Committee discusses with District Collector | दाभोलकर हत्येप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

दाभोलकर हत्येप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

रत्नागिरी : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या सूत्रधारांना पकडण्यात गेली आठ वर्षे सरकारला अपयश येत आहे. याबाबत शासनाला आठवण करून देत या हत्येकरींना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. डाॅ. पाटील यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत यावेळी सकारात्मक चर्चा केली.

२० ऑगस्ट २०२१ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खुनाला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ साली वीरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंद्रे व मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. अमोल काळे, अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींविरूद्धदेखील अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या खुनाचा तपास वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. तरीही या खुनामागील सूत्रधार कोण आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गोरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत.

सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रानुसार खुनाचा तपास करताना या प्रकरणातील संशयित आरोपींचा कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गाैरी लंकेश यांच्या खुनाशी असलेला संबंध रेकॉर्डवर आलेला आहे व त्यातून ही फक्त खुनाची घटना नसून हे दहशतवादी कृत्य असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींना Unlawful Activities Prevention Act 1967 हा कायदा लावण्यात आला आहे. असं असतानाही अद्याप डाॅ. दाभाेलकर यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागला नसल्याबद्दल या निवेदनात खंत व्यक्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी पुढील तपास होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार कोण आहेत, हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे. अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही, त्यामुळे या खुनामागील सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करावी, अशा मागणीचे निवेदन शासनाकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी विनोद वायंगणकर, मधुसूदन तावडे, राजेश कांबळे, राधा वणजू, वल्लभ वणजू आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Dabholkar murder case: Anti-Superstition Committee discusses with District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.