दाभोळ खाडी प्रदूषणाच्या विळख्यात
By Admin | Updated: July 9, 2014 00:28 IST2014-07-09T00:21:06+5:302014-07-09T00:28:11+5:30
महसूलचा कारभार : नियम धाब्यावरए वाळू काठावर... हा प्रकार थांबणार कधी असा सवाल

दाभोळ खाडी प्रदूषणाच्या विळख्यात
सुमय्या तांबे : खाडीपट्टा. बारमाही दुथडी वाहणाऱ्या दाभोळखाडी, वाशिष्टी व जगबुडी नदीच्या संगमावर लोटे येथील उद्योग, कारखान्यातून सन १९९६-९७ पासून सोडण्यात येत असलेल्या मळी आणि रसायनांमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. या दूषित पाण्यामुळे नदीतील बहुमूल्य जलप्राण्यांचा, माशांचा संहार होत आहेए तर सातत्याने दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
१९९६-९७ पूर्वी या तिन्ही नद्यांतील पाणी सर्वाधिक सुरक्षित असे म्हटले जात होते. पण, १९९६-९७ सालापासून सातत्याने या नद्यांमध्ये लोटे येथील उद्योग, कारखान्यातून मळीमिश्रीत आणि धोकादायक रसायनयुक्त दूषित पाणी सोडले जात आहे. खेड खाडीपट्ट्यातील वाहणाऱ्या दाभोळ खाडी व जगबुडी नदीचे पाणी पूर्णपणे धोकादायक बनले असल्याचे चित्र आहे. पण, याकडे कोणताही जबाबदार लोकप्रतिनिधी अथवा राज्यकर्ते गांभीर्याने पाहात नसल्याचे खेदजनक चित्र आहे. दरम्यान, दूषित पाणी सातत्याने प्यावे लागत असल्याने शिर्शी, कर्जी आमशेत, सवणस, तुंबाड, बहिरवली व पन्हाळजे आदी नदीकाठांवरील गावांमध्ये रोगराईचे प्रमाण वाढू लागले आहे. मात्र, याची कोणाला ना खंत ना खेद, असेच संतापजनक चित्र आहे. बहुमूल्य जलसंपत्तीचा नाश होत आहे. दरम्यान, नदीत सातत्याने धोकादायक रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडू लागले आहेत. अक्षरश: कोट्यवधीच्या संख्येने हे मत्स्यधन पाण्यात संपू लागले आहे. वाम, रेनवी, कालचर आदी पारंपरिक माशांच्या जातींची या नदीत मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. पण, दूषित पाण्याने हे मत्स्यधन मृत्यूमुखी पडू लागले आहे. याकडे कोणी गांभीर्याने पाहात नाही. खाडीपट्ट्यातील नदीकाठच्या अनेक गावांमध्ये कोट्यवधीचा खर्च करुन पिण्याच्या पाण्याची उभारणी करण्यात आली आहे. पण, नदीतील पाणी दूषित होऊ लागल्याने या योजना अक्षरश: कुचकामी ठरतात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. तसेच नदीत होणाऱ्या वाळू उत्खननाचा गंभीर परिणाम लोकवस्तीवर होत असल्याने पाणी योजनाही पाण्यात जात आहेत, याची काळजी घ्यावी.