रत्नागिरी : जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलद गतीने केले जात आहेत. जिल्ह्यात १७ घरे पूर्णत: बाधित झाली असून, अंशत: बाधित घरांची संख्या ७८६५ आहे. यात सर्वाधिक दापोली तालुक्यात २४६६ घरे आहेत. रत्नागिरी तालुक्यात ११०९ तर राजापूर तालुक्यात ८९३ घरांचे नुकसान झाले आहे. ४४६ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर येथील एक व रत्नागिरी येथील एक अशा दोन झोपड्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. वादळाच्या वाऱ्यामुळे १०४२ झाडे पडली. यात सर्वाधिक ७९२ झाडे राजापूर तालुक्यातील असून, रत्नागिरीत २५० झाडे बाधित झाली आहेत.
तौक्ते चक्रीवादळात जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू झाला असून, ९ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मृत पशुधनाची संख्या ११ आहे. ६० दुकाने व टपऱ्यांचे नुकसान झाले असून, नुकसान झालेल्या शाळांची संख्या ५६ आहे. या सर्व शाळा राजापूर तालुक्यामधील आहेत.
या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर फळबागांचे नुकसान झाले. अंदाजे ११ हजार शेतकऱ्यांचे यात साधारण २५०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यातील ५७०९ शेतकऱ्यांच्या १२७८.६ हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका विद्युत वितरण कंपनीला बसला. यात १२३९ गावांतील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. आतापर्यंत ११७९ गावांचा पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. बाधित उपकेंद्रांची संख्या ५५ व फिडरची संख्या २०६ आहे. याची दुरुस्तीदेखील आता पूर्ण झाली आहे. वीज खांबांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उच्चदाब वाहिनीचे ४८५ खांब बाधित झाले असून, यापैकी १२५ पूर्ववत करण्यात आले आहेत. गावागावांत पडलेल्या वीज खांबांची संख्या १२३३ इतकी आहे. यातील १३३ खांबांची उभारणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर आश्रयास आलेल्या बोटींपैकी ३ बोटींचे पूर्णत: तर ६५ बोटींचे अंशत: नुकसान झाले. ७१ जाळ्यांचेही नुकसान झालेले आहे. अंदाजित नुकसान १ कोटी रुपयांपर्यंत आहे.
तौक्ते चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या ३०१ मालमत्ता बाधित झाल्या असून, अंदाजे १ कोटी ९८ लाख ८४ हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.