भांबेड येथील एटीएम बंद असल्याने ग्राहकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST2021-08-29T04:30:45+5:302021-08-29T04:30:45+5:30
लांजा : गेल्या महिनाभरापासून भांबेड येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम बंद असून, भांबेड परिसरातील नागरिकांची यामुळे प्रचंड गैरसोय होत ...

भांबेड येथील एटीएम बंद असल्याने ग्राहकांचे हाल
लांजा : गेल्या महिनाभरापासून भांबेड येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम बंद असून, भांबेड परिसरातील नागरिकांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. येथील ग्रामस्थांना केवळ पैसे काढण्यासाठी पंधरा किलोमीटर दूर लांजा शहरात जावे लागत आहे. त्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून, गणेशोत्सवापूर्वी हे एटीएम पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
भांबेड बाजारपेठत बँक ऑफ इंडियाचे एकमेव एटीएम कार्यरत होते. या एका एटीएमवर भांबेड परिसरातील दहा ते पंधरा गावांतील लोक विसंबून आहेत. मागील काही वर्षे बँक ऑफ इंडिया भांबेड शाखेने हे एटीएम वेळोवेळी डागडुजी करून कायमस्वरूपी सुरू ठेवले होते. मात्र, महिन्याभरापूर्वी ते बंद पडले. अजूनही ते बंदच आहे. एकमेव एटीएमही बंद झाल्याने पैसे काढण्यासाठी परिसरातील लोकांना १५ किलोमीटर लांब लांजामध्ये यावे लागत आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात असंख्य मुंबईकर गावी येतात. या कालावधीत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या सामानाची खरेदी केली जाते. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे लोकांना या काळात रोख रकमेची नितांत गरज असते. मात्र, नेमक्या त्याच काळात एटीएम बंद आहे. ही गैरसोय तत्काळ दूर करण्याची मागणी केली जात आहे.