आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST2021-03-23T04:33:29+5:302021-03-23T04:33:29+5:30
राजापूर : राजापूर शहरात दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूटमार होत असून वाढीव दराने मालाची विक्री ...

आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट
राजापूर : राजापूर शहरात दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूटमार होत असून वाढीव दराने मालाची विक्री केली जात असल्याचा आराेप नागरिक सदाशिव बापू तांबडे यांनी केला आहे. या प्रकाराबाबत त्यांनी सहकाऱ्यांसह आठवडा बाजारात जाऊन संबंधित व्यापाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
राजापुरात दर गुरुवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारात सर्व प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात. तसेच कृषीसह किराणा मालही उपलब्ध असतो. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव बाजारात घसरले असतानाच राजापूरच्या आठवडा बाजारात आलेले व्यापारी कमी प्रतीचा कांदा ३० रुपये प्रती किलो भावाने विक्री करतात.
दरम्यान, स्थानिक नागरिक सदाशिव बापू तांबडे हे आपल्या काही सहकाऱ्यांसह आठवडा बाजारात गेले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. सदाशिव तांबडे यांनी संबंधित व्यापाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्यानंतर कांदाचा दर वीस रुपये प्रती किलो करण्यात आल्याचे तांबडे यांनी सांगितले. येत्या गुरुवारी आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांची नगरपरिषदेने चाैकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
चाैकट
फळांवर केमिकल्सचा वापर
आठवडा बाजारात विविध प्रकारची फळे विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यावर केमिकल्सचा वापर केला जातो. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब धोकादायक असतानाच स्थानिक नगरपरिषदेचे आरोग्य प्रशासन मात्र त्याकडे सपशेल कानाडोळा करत असल्याचे तांबडे यांनी म्हटले आहे. नागरिकांची हाेणारी लयलूट थांबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.