एमपीडीए कायद्यान्वये सराईत गुन्हेगार पाेलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:59+5:302021-08-21T04:36:59+5:30
रत्नागिरी : एमपीडीए कायद्यान्वये रत्नागिरीतील सराईत गुन्हेगार शाहीद सादिक मुजावर (२७, रा. बेलबाग, धनजीनाका, रत्नागिरी) याला रत्नागिरी शहर पाेलिसांनी ...

एमपीडीए कायद्यान्वये सराईत गुन्हेगार पाेलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी : एमपीडीए कायद्यान्वये रत्नागिरीतील सराईत गुन्हेगार शाहीद सादिक मुजावर (२७, रा. बेलबाग, धनजीनाका, रत्नागिरी) याला रत्नागिरी शहर पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशाप्रकारे आराेपीला स्थानबद्ध करण्याची ही जिल्ह्यातील दुसरी कारवाई आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ पायरेटस्), वाळू तस्कर व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम, १९८१ (एमपीडीए कायदा) अन्वये कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार शाहीद सादिक मुजावर याला एमपीडीए कायद्यान्वये रत्नागिरी जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी तसेच विविध स्तरावर आणि निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी छाननी केली. छाननी अंती दि. १८ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी शाहीद सादिक मुजावर याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी त्याला शोधण्यासाठी विविध पथके तयार केली हाेती. गुरुवार, दि १९ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला रत्नागिरी विशेष कारागृह येथे स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ही दुसरी कारवाई असून, यापूर्वी सन २०१४-२०१५ मध्ये पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी गुहागर येथे कार्यरत असताना एका हातभट्टी दारु व्यावसायिकाविरुद्ध अशा कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्या हातभट्टी दारु व्यावसायिकाला या कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले होते.
-----------------------------
अनेक प्रकारचे गुन्हे दाखल
शाहीद सादिक मुजावर याच्या विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात चाेरी, जबरी चोरी, दुखापत करणे, शिवीगाळ करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. सन २०१४ मध्ये त्याला रत्नागिरी जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार केले होते. त्याच्याविरुद्ध चॅप्टर केसही करण्यात आली होती. तरीही त्याच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नव्हत्या. कायद्याला न जुमानता, त्याने त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरुच ठेवली. त्याच्या गुन्हेगारीस बळी पडलेले सर्वसामान्य लोक त्याला घाबरुन तक्रारही देत नव्हते याबाबतची खात्री आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक राजेश कानडे यांनी केली. त्यानुसार हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.