आंतरपीक म्हणून हळदीची लागवड शेतकऱ्यांसाठी लाभदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST2021-03-23T04:33:04+5:302021-03-23T04:33:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क आबलोली : काेकणातील शेतकरी पारंपरिक पिकांबराेबरच नवीन प्रयाेग करू लागला आहे. गुहागर तालुक्यातील आबलाेली येथील ...

आंतरपीक म्हणून हळदीची लागवड शेतकऱ्यांसाठी लाभदायक
लाेकमत न्यूज नेटवर्क
आबलोली : काेकणातील शेतकरी पारंपरिक पिकांबराेबरच नवीन प्रयाेग करू लागला आहे. गुहागर तालुक्यातील आबलाेली येथील शेतकरी सचिन कमलाकर कारेकर यांनी SK-४ (स्पेशल कोकण-४) ही हळदीची नवीन जात विकसित केली आहे. गेली वीस वर्षे ते हळदीचे उत्पादन घेत आहेत. तसेच निगुंडळ येथील शेतकरी गजेंद्र नारायण पाैनिकर यांनी हळद लागवडीचा प्रयाेगही यशस्वी केला आहे.
हळदीच्या या शेती प्रकल्पांना दापाेली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मसाला पीक विभागाचे डॉ. प्रफुल्ल माळी यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच हळद उत्पादन आणि प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले.
कोकणामध्ये आंबा, काजू, नारळ, पोफळी यांच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या या प्रमुख फळपिकांमध्ये उत्पन्नाचे प्रमाण घटत आहे. अशावेळी ही घट भरून काढण्यासाठी या बागेत आंतरपीक म्हणून हळद लागवडीचा उत्तम पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे.
पावसाळ्यापूर्वी हळकुंडापासून रोपे तयार करून लावल्यास पावसाच्या पाण्यावर हळद पिकाचे उत्पादन घेता येऊ शकते. मोठ्या प्रमाणात होणारा वानर, माकड, डुक्कर आदी जंगली प्राण्यांचा उपद्रव हळद पिकाला होत नाही. शेतकऱ्यांनी हळद पिकाचा आंतरपीक म्हणून विचार केल्यास त्यातून चांगले अर्थार्जन होऊ शकते, असा आशावाद डॉ. प्रफुल्ल माळी यांनी व्यक्त केला आहे.
काेट
हळदीचे पीक हे निर्यातक्षम पीक असून कोकणातील शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे लक्ष दिल्यास या पिकाला सोन्याची झळाळी प्राप्त होईल. आंतरपीक म्हणून हळदीची लागवड शक्य आहे. यासाठी कोकण कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेल. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास हळद लागवडीतून शक्य होऊ शकतो.
- डॉ. प्रफुल्ल माळी,
मसाला पिके व उद्यान विद्या विभाग, दापोली.