कासईत दरडीचा धोका
By Admin | Updated: June 29, 2015 00:28 IST2015-06-28T22:38:48+5:302015-06-29T00:28:11+5:30
टांगती तलवार : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जीव मुठीत

कासईत दरडीचा धोका
खेड : खेडपासून ४० किलोमीटरवर असलेल्या कासईला अद्याप दरडींचा धोका कायमच आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने कासई बोरवाडी रस्ता पूर्णपणे बंद पडल्याने वाहतूक बंद पडली आहे़ या मार्गावरील एस. टी. वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी संबंधित अभियंता एस. के. पाटील यांना कळवल्यानंतरही ही दरड हटविण्यात न आल्याने या मार्गावरील १२ गावांचे मोठे नुकसान झाले आहे. अभियंत्यांनी या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी रमेश उतेकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे़कासई गावातील घाटमाथ्यावर असलेल्या बोरवाडी येथील ६ जणांच्या घरावर ही दरड कोसळली आहे. गोविंद गणपत गोवळकर, बाळकृष्ण शंकर हरेकर, दीपक सखाराम सावंत, धोंडू कंचावडे, अशोेक शिंंदे यांच्या घरांवर ही अजस्त्र दरड कोसळली आहे. या घटनेला ५ दिवस झाले़ त्यामुळे पावसाचे पाणी त्यांच्या घरात जात असून, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे़
मात्र, अद्याप या दरडीची पाहणी करण्यासाठी किंवा नुकसान भरपाई देण्यासाठी अभियंता पाटील घटनास्थळी पोहोचले नाहीत़ महसूल यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. रघुवीर घाट आणि धामणंद विभागातील १६ गावांचा दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा मार्ग म्हणून खेड खोपी ते कासई-धामणंद मार्ग हा पूर्णत: निकृष्ट झाला आहे. कासई येथील ६ घरांवर दरड कोसळल्याने हा मार्ग आता पूर्ण बंद पडला आहे़ त्यामुळे या मार्गावरील ग्रामस्थांचे, विद्यार्थ्यांचे आणि व्यावसायिकांचे मोठे हाल होत आहेत. हा मार्ग तातडीने खुला न झाल्यास अभियंता पाटील तसेच महसूल यंत्रणेविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत ग्रामस्थांना पावले उचलावी लागतील, असा इशारा रमेश उतेकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. या भागात धोकादायक दरडींचा अहवाल तयार करण्यात आला होता काय? असला तर त्याच्यावरील कृती कार्यक्रम का झाला नाही, असा सवाल उतेकर यांनी विचारला आहे. (प्रतिनिधी)
रघुवीर घाटातील दरडी कोसळण्याच्या घटना ताज्या असतानाच कासई येथे दरडी कोसळल्या. त्यावेळेपासून कासईच्या आसपासची १९ गावे दळणवळणापासून वंचित राहिली आहेत. दरडी कोसळण्याच्या घटना ताज्या असताना आता यावर उपाययोजना कडक व्हावी, अशी मागणी रमेश उतेकर यांनी केली आहे. धोकादायक दरडी कोसळण्याच्या प्रकारानंतर याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. ही बाब संबंधित विभागाने गांभिर्याने घ्यावी, असा आग्रह धरला आहे.