पोस्टात पैसे काढण्यासाठी गर्दी
By Admin | Updated: February 15, 2015 00:46 IST2015-02-15T00:46:10+5:302015-02-15T00:46:10+5:30
घोटाळा उघड : डाक खात्याविषयीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

पोस्टात पैसे काढण्यासाठी गर्दी
रत्नागिरी : पोस्टातील कर्मचाऱ्याने आरडी, पोस्ट इन्शुरन्स, मनीआॅर्डरच्या नोंदी डिलीट करुन लाखो रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर डाक विभागातील घोटाळा जनतेसमोर आला आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये असलेली पोस्टाविषयीची विश्वासार्हता धुळीला मिळाली आहे. नागरिकांमधून घबराट उडाल्याने पोस्टातील पैसे काढण्याकरता ग्राहकांची गर्दी झाली होती.
लॉग ईन आयडी व पासवर्डचा वापर करुन आरडी, पोस्ट इन्शुरन्स व मनीआॅर्डरच्या एंट्री डिलीट करुन १३५ पेक्षा अधिक ग्राहकांचे पैसे हडप करण्यात आले. मुख्य डाकघर विभागातील हा घोटाळा जनतेसमोर आला आहे. मात्र, या घोटाळ्यामुळे नागरिकांसमवेत कर्मचाऱ्यांनाही हादरा बसला आहे.
या कर्मचाऱ्याने यापूर्वीही अन्य तालुक्यात नोकरीवर असताना घोटाळा केला होता. त्याला तात्पुरते निलंबन देण्यात आले होते. परंतु, चौकशीनंतर पुन्हा त्याची नेमणूक रत्नागिरी मुख्य डाकघर कार्यालयात करण्यात
आली.
पोस्टात व्यवहार कोअर बँकींग प्रणालीद्वारे आॅनलाईन पद्धतीने करण्यात आला आहे. प्रत्येक विभागासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनीआॅर्डर, आरडी, पोस्ट इन्शुरन्स आदीची जमा एंट्री करण्यासाठी लॉग ईन आयडी व पासवर्ड ठेवण्यात आले आहेत. मात्र, संबंधित आयडी व पासवर्डचा वापर करुन एंट्रीज डिलीट करण्यात आल्या आहेत. खातेदाराच्या पुस्तकावर एंट्री दिसत असली, तरी प्रत्यक्षात मात्र एंट्री झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांकडे आरडी व इन्शुरन्सचे पैसे थकल्याचे निदर्शनास आले आहे.
संबंधित घोटाळा उघडकीस आल्यामुळे ग्राहकांनाही हादरा बसला आहे. ग्राहकांचे पैसे प्रत्यक्षात न भरले गेल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. मात्र, एका खातेदाराच्या चाणाक्षपणामुळे हा घोटाळा उघडकीस आला आहे. टपाल खात्यातर्फे प्रत्यक्षात संबंधित अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई केली जाईल, याबाबत चर्चा सुरु आहे.
संबंधित घटनेचे वृत्त कळताच नागरिकांनी आज स्वत:चे पोस्टातील पैसे काढण्यासाठी व विमा, आरडी, मनीआॅर्डर सुरक्षित असल्याचे पहाण्याकरिता पोस्टात धाव घेतली होती. यासंबंधी ‘लोकमत’ प्रतिनिधींकडून डाकघर अधीक्षक बी. आर. सुतार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला असता दूरध्वनी न उचलल्यामुळे याबाबत काहीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
कर्मचाऱ्याच्या चौकशीसाठी स्वतंत्र समितीची नियुक्ती करण्यात आली असली, तरी आज एकूण किती ग्राहकांनी पैसे काढून घेतले किंवा एकूण किती रकमेचा घोटाळा झाला असल्याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. (प्रतिनिधी)