गणेशोत्सवाच्या गर्दीत कोरोना नियमावलींचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST2021-09-12T04:36:00+5:302021-09-12T04:36:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क प्रशांत सुर्वे/मंडणगड : गणेशोत्सवासाठी तालुक्यात दाेन दिवसांपासून गणेशभक्त दाखल हाेऊ लागले आहेत. त्यामुळे तालुक्यात गर्दी वाढली ...

गणेशोत्सवाच्या गर्दीत कोरोना नियमावलींचा फज्जा
लाेकमत न्यूज नेटवर्क
प्रशांत सुर्वे/मंडणगड : गणेशोत्सवासाठी तालुक्यात दाेन दिवसांपासून गणेशभक्त दाखल हाेऊ लागले आहेत. त्यामुळे तालुक्यात गर्दी वाढली आहे. काेराेना काळात अधिक सजग राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणीचे अधिकार असलेले महसूल प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, नगरपंचायत व ग्रामपंचायत काहीशी सुस्त असल्याचे दिसत आहे. तालुक्यात दाखल हाेणाऱ्यांच्या तपासणीसाठी आराेग्य पथकाचा तपासणी नाका उभारलेला नाही, तर वाहतूक नियंत्रणाकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेताना दिसत आहे.
तालुक्यात ८ व ९ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने खासगी वाहनाने चाकरमानी दाखल झाले. नगरपंचायतीने चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी तपासणी नाका उभारणे करणे आवश्यक हाेते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. मात्र, मंडणगड तालुक्यात असा कोणताही नाका उभारलेला नाही. त्याचबराेबर, गेल्या दोन दिवसांत शहरातील वाहतूक वाढलेली असताना, वाहतुकीचे नियंत्रण हाेत नसल्याने, अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण हाेत आहे. चाकरमान्यांनी या वर्षी खासगी वाहनांना अधिक पसंती दिली. त्यामुळे शहरात इंधनाची मागणी वाढली आहे. पेट्रोल पंपावर इंधनाचा अभाव आणि अन्य कारणांमुळे खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. ही वाहने मुख्य रस्त्यावर उभी करण्यात आल्याने, या वाहनांमुळे वाहतुकीला अडचणी निर्माण हाेत आहेत. वाढलेल्या गर्दीत अनेक जण सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्क वापर न करता फिरताना दिसत आहेत. मात्र, त्यांना अटकाव करणारे काेणीच जागेवर दिसत नाहीत. वाढलेल्या गर्दीने शहरात कोरोना नियमावलीचा पुरता फज्जा उडविल्याचे दिसत आहे.
गणेशोत्सवासाठी बाजारपेठ सज्ज
गणेशोत्सवाच्या स्वागताला शहराची स्थानिक बाजारपेठ गेल्या चार दिवसांपासून सजलेली आहे. बाजारात फळे, सजावट सामान, रोषणाई या वस्तूंना विशेष मागणी असते. या सामानाच्या खरेदीसाठी बाजारात स्थानिकांनी गर्दी केली हाेती.
रिक्षा व्यावसायिकांना प्रतीक्षा
वाहतुकीसाठी परिवहन महामंडळाने गाड्यांची थेट गावागावात बुकिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याचा परिणाम रिक्षा व्यवसायावर झाला आहे. बस स्थानकात प्रवाशांची संख्या कमी असल्याने रिक्षावाल्यांना सवारीची प्रतीक्षा आहे.