‘सोळकोबा-बाळकोबां’साठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 23:53 IST2015-09-19T23:53:03+5:302015-09-19T23:53:16+5:30
मानाचे गणपती : मांडवीतील घरगुती गणेशाला सार्वजनिक रूप

‘सोळकोबा-बाळकोबां’साठी भाविकांची गर्दी
रत्नागिरी : शहरातील मांडवी येथे शिवलकर घराण्यांचे व त्यांच्या आठव्या पिढीचे आराध्य दैवत सोळकोबा-बाळकोबाच्या दर्शनास भाविकांची गर्दी होत आहे. शिवलकर कुटूंबियांचा हा उत्सव असला तरी संपूर्ण मांडवी गाव या उत्सवात सहभागी होत असल्यामुळे वेगळेच चैतन्य निर्माण होते.
शाडूच्या मातीपासून सोळकोबा व बाळकोबा यांच्या मूर्ती तयार केल्या जातात. आजपर्यत अनेक नामवंत मूर्तीकारांना दोन्ही मूर्ती तयार करण्याचा मान मिळाला आहे. रामआळीतील कै. बाबूराव पाटणकर यांच्यासह त्यांच्या तीन पिढ्यांनी मूर्ती साकारली आहे. त्यानंतर पुंडलिक शिवलकर यांनी ३० वर्षे, अमित पेडणेकर यांनी ८ वर्षे तर स्वत: राजेश शिवलकर गेले अनेक वर्षे ही गणेशमूर्ती तयार करीत आहेत. प्रसिध्द मूर्तीकार घनश्याम भाटकर यांनीही सोळकोबा व बाळकोबांच्या मूर्ती घडविल्या आहेत. सोळकोबाची मूर्ती गेली दहा वर्षे अमित पेडणेकर घडवत आहेत.
दोन्ही मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे इको फे्रंडली गणेशमूर्ती आहेत. कारण शाडूप्रमाणे रंगकामासाठी केवळ जलरंग वापरले जात आहेत. मांडवी गावात गणेशोत्सवाची सुरूवात बाळकोबा - सोळकोबा यांच्या प्रतिष्ठापनेपासून होते. शहरातील अनेक नागरिक बाळकोबा गणपतीची प्रतिष्ठापना झाल्याशिवाय स्वत:च्या गणपतीची प्रतिष्ठापना करत नाहीत.
बाळकोबाच्या प्रतिष्ठापनेसाठी वेदमूर्ती चिंतुकाका जोशी आवर्जून उपस्थित राहतात. त्यांची ही सातवी पिढी आजही श्रींच्या सेवेत आहेत. सोळकोबा - बाळकोबा गणपतींचे विसर्जन गौरी - गणपतीच्या दिवशी केले जाते. खांद्यावरून विसर्जनासाठी रत्नागिरीचे मानाचे हे दोन गणपती निघाले की, भाविकांची गर्दी होते. मांडवी किनाऱ्यावर देखील सोळकोबा व बाळकोबाच्या दर्शनासाठी भाविक आवर्जून उपस्थित असतात. (प्रतिनिधी)