पावसामुळे पिकाचे नुकसान
By Admin | Updated: September 30, 2014 00:14 IST2014-09-30T00:09:30+5:302014-09-30T00:14:03+5:30
शेतकरी चिंतातूर : हळवे भातपीक धोक्यात येण्याची चिन्हे

पावसामुळे पिकाचे नुकसान
कुवे : नवरात्रोत्सवात सतत पडणाऱ्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भातपिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. ओल्या दुष्काळाचीही शक्यता आहे.
बहुतांश शेतकरी ९० दिवसांमध्ये तयार होणारे हळवे बियाणे वापरतात. हळवी भातशेती सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तयार होते. यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केल्याने भातपीक आॅक्टोबर महिन्यात कापणीला योग्य होईल, असा अंदाज शेतकरीवर्गाने वर्तवला आहे. मात्र, या नवरात्रोत्सवात सतत पडणाऱ्या पावसामुळे तयार भातपीक आडवे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
कुवे परिसरातील भातशेतीवर कीड, तर काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने भातशेती पूर्णपणे आडवी होत आहे. बहुतांश ठिकाणी कीड आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
पावसाप्रमाणे वन्य प्राण्यांकडूनही भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. रानटी प्राणी भाताच्या लोंबी तोंडत असल्याने जनावरांच्या उपद्रवामध्ये भातपिकाचे संरक्षण करणे शेतकरीवर्गाला अवघड झाले आहे.
सतत पडणाऱ्या या पावसामुळे आता यावर्षी भात कापणीचा हंगाम लांबणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. भातपीक तयार झाले असून, आणखी १५ ते २० दिवसांनी कापणीला सुरुवात होणार आहे. मात्र, पावसाच्या या रोजच्या हजेरीमुळे हा हंगाम दिवाळीपर्यंत लांबणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. भात कापणीचा हंगाम सुरू होत असल्याने व मध्ये पडणाऱ्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत.
जिल्ह्यात वादळी पावसाने काही कालावधी थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे प्रमाण वाढले आहे. भातशेतीच्या हळव्या पिकावर पावसाचे सावट असून हे पिक हातचे जाईल याबाबत शेतकरी साशंक असून सततच्या पावसामुळे लांजा, देवरूख, राजापूर, दापोली, खेड या भागातील भातशेती धोक्यात ्आली ्आहे. याबाबत तज्ञानी भिती व्यक्त केली जात आहे. कोकणात यंदा पावसाची सरासरी ओलांडली असून उरलेल्या कालावधीत अजून पाऊस पडला तर शेतकऱ्यांच्या हातचे पिक जाणार आहे.
पावसाच्या संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निवडणूक काळानंतर काय करता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
सतत पडणाऱ्या पावसामुळे ओल्या दुष्काळाची नांदी.
पावसामुळे भातपीक आडवे होऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
उकाडा वाढला.
नवरात्रोत्सवात पावसाची हजेरी कायम.
भातशेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान.
भातशेतीचा कापणीचा हंगाम लांबणार.
कोकणात यंदा पावसाची सरासरी पूर्ण झाली. हा पाऊस दसऱ्याला पूर्ण थांबतो. यंदा नवरात्रात सायंकाळी पाऊस पडत असल्याने दांडियाप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच हळव्या शेतीचे नुकसान होत आहे. लांजा तालुक्यात भातशेतीला फटका बसत आहे.