संकटमोचक ‘सागरी बोयाज’ संकटात!
By Admin | Updated: July 12, 2014 00:38 IST2014-07-12T00:35:33+5:302014-07-12T00:38:10+5:30
प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी मच्छिमारांना सागरी नौकानयनाचा सुरक्षित मार्ग दाखविणारी व अपघातांपासून अप्रत्यक्षरित्या वाचवित ‘संकटमोचक’ म्हणून

संकटमोचक ‘सागरी बोयाज’ संकटात!
प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी
मच्छिमारांना सागरी नौकानयनाचा सुरक्षित मार्ग दाखविणारी व अपघातांपासून अप्रत्यक्षरित्या वाचवित ‘संकटमोचक’ म्हणून भूमिका बजावणारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रातील १६ बोयाजच यंदा संकटात सापडली आहेत. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्री लाटांनी साखळ्या तुटल्याने ५ बोयाज खोल सागरात वाहनू गेली आहेत, तर बेजार झालेली उर्वरित ११ बोयाज साखळ्या तुटून भरकटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरवर्षी ही बोयाज मे महिन्यात मेरिटाईम बोर्डाकडून त्यांच्या बार्जमार्फत समुद्रातून काढून बंदरात आणल्यानंतर ती सुरक्षित ठिकाणी ठेवली जातात. तसेच सप्टेंबर महिन्यात ही बोयाज पुन्हा सागरात त्यांच्या नियोजित स्थळी लावली जातात. यंदा ही बोयाज मे महिन्यात सागरातून काढलीच गेली नाहीत. परिणामी सर्वच बोयाज सध्या खवळलेल्या समुद्रात संकटात सापडली आहेत. मेरिटाईम बोर्डाच्या दुर्लक्षामुळे हे घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेपर्यंत सागरात किनाऱ्यालगत अशी १६ बोयाज आहेत. रत्नागिरीच्या समुद्रात असलेल्या तीनपैकी दोन बोयाज साखळ्या तुटून खोल सागरात वाहून गेली आहेत.
मालवणमधील २, तर वेंगुर्लेतील १ बोयाजही साखळी तुटल्याने सागरात भरकटली आहेत. शासकीय खात्याच्या उदासिनतेचा फटका या बोयाजना बसला असून, हे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आहे. या निष्क्रियतेला जबाबदार कोण, असा सवाल केला जात असून, याबाबत मच्छिमारांतून संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
अशी आहे बोयाज यंत्रणा...
कोकणच्या संपूर्ण किनाऱ्यावरच १२ ते २८ मीटर खोलीच्या सागरी पाण्यात ही बोयाज नौकानयनाचा सुरक्षित मार्ग दर्शविण्यासाठी ब्रिटीशकाळापासूनच उभारली जात होती. स्वातंत्र्यानंतरही ही सुरक्षा यंत्रणा कायम आहे. बलूनसारख्या आकारातील एका लोखंडी बोयाजचे वजन अडीच ते तीन टनापर्यंत असते. त्याची किंमत २ लाखापर्यंत असून, त्यावर दीड लाख रुपये किमतीचा सौरऊर्जेवर चालणारा दिवा बसविलेला असतो. लोखंडाच्या जाड साखळीत हा बोया अडकवून साखळीचे दुसरे टोक ४ ते ५ टन वजनाच्या सिमेंट ब्लॉकला अडकवून सिमेंट ब्लॉक बार्जद्वारे सागरात सोडला जातो. त्याद्वारे हे बोयाज सप्टेंबर महिन्यात स्थिर केले जाते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यात बार्जद्वारेच ही बोयाज साखळी वर खेचून व सिमेंट ब्लॉकची साखळी तोडून बार्ज (नौका) मध्ये घेतले जाते व सिमेंट ब्लॉक पाण्यात सोडून दिला जातो.