चिपळुणात आणखी ३ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST2021-05-12T04:31:43+5:302021-05-12T04:31:43+5:30
चिपळूण : अनेकवेळा समज देऊनही दुकाने उघडी ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिपळूण पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. सोमवारी दिवसभरात पोलिसांनी ...

चिपळुणात आणखी ३ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल
चिपळूण : अनेकवेळा समज देऊनही दुकाने उघडी ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिपळूण पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. सोमवारी दिवसभरात पोलिसांनी तिघांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले. त्यापैकी एक बाजारपेठ तर गोवळकोट रोड येथील दोन व्यापाऱ्यांचा समावेश आहे. तसेच वाहनांवरही धडक कारवाई केली जात आहे.
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत मुभा देण्यात आली आहे, तर अन्य दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तरीही सकाळी ११ नंतर काही जण दुकानाचे शटर बंद करून मागील दराने ग्राहकांना दुकानात घेऊन व्यापार करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पोलिसांनी थेट कारवाईचे सत्र सुरू केले आहे. सोमवारी बाजारपेठेत पोलीस आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांची गस्त सुरू असताना एक मोठे सुपर मार्केट मागील दाराने सुरू असल्याचे पाहिले. तसेच गोवळकोट रोड येथे सायंकाळी रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विक्री सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी बाजारपेठ येथील हतीज कासम दलवाई आणि गोवळकोट रोड येथील अब्दुल रहिमान पलनाईक व नईम अब्दुल रहिमान खतीब या तिघांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ हे गस्त आणि कारवाई करत असताना दुसऱ्या बाजूला पोलिसांनी विनाकारण व विना हेल्मेट फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. आतापर्यंत ४०० हून अधिक वाहनधारकांवर कारवाई केली आहे.