खेड : शहरातील तहसीलदार कार्यालयासमोर एका विक्रेत्याने हातगाडीवरील विक्रीसाठी आणलेले ताडगोळे गटाराच्या सांडपाण्यात धुतल्याचा प्रकार बुधवारी (१६ एप्रिल) उघडकीस आला होता. याप्रकरणी खेडपोलिस स्थानकात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. हा विक्रेता ताडगोळे गटारात धूत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. याबाबत पोलिस शिपाई तुषार रमेश झेंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी अलाउद्दीन कुवुस शेख (६४, रा. बालुग्राम पश्चिमी, ता. उधवा दियारा, जि. साहेबगंज, झारखंड) याने विक्रीसाठी आणलेले ताडगोळे रस्त्यालगत असलेल्या गटाराच्या सांडपाण्यात धुतले.
त्याने केलेला हा गलिच्छ प्रकार चित्रित केला गेला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याआधीही वेगवेगळ्या भागातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र असा काही प्रकार कोकणातही घडेल, अशी शक्यता वाटत नव्हती, असा सूर अनेकांच्या बोलण्यात उमटत आहे. या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.